काँग्रेसची हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई होत नसताना आता सर्वसामान्यांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या समर्थनार्थ सर्वसामान्य एकवटू लागल्याचे चित्र नाशिक जिल्ह्य़ात दिसू लागले आहे. जिल्ह्य़ातील वणी येथे पोलिसांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिला व मुलांची उपस्थिती लक्षवेधक होती. दुसरीकडे, नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पोलिसांवरील हल्ले रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.

नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी मागील आठवडय़ात पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले. नाशिकमध्ये आठवडय़ात पोलिसांवरील हल्ल्याचे चार प्रकार घडले. त्यापैकी टोळक्याच्या हल्ल्यात जखमी असलेले हवालदार विजय मोरे यांच्यावर अजूनही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांवरील या हल्ल्यांमुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झाले आहेत. त्याचे पडसाद आता उमटू लागले असून वणी येथे पोलिसांच्या समर्थनार्थ गावातील प्रमुख मार्गाने विविध घोषणा असलेले फलक हातात घेऊन मूक मोर्चा काढण्यात आला. गावातील प्रमुख व्यक्तींनी शासकीय प्रतिनिधी म्हणून महसूल विभागाच्या मंडल अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला. मोर्चात सर्वपक्षीयांनी सहभाग घेतला हे विशेष होय. वणी पोलीस ठाण्याअंतर्गत १३५ ते १४० गाव-खेडी आहेत. वणीची लोकसंख्या सुमारे २० हजार आहे. वणी ही परिसरातील मोठी व्यापारी पेठ असल्याने सहाजिकच परिसरातील खेडय़ांमधील ग्रामस्थांना बाजारहाटसाठी वणी येथेच यावे लागते. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव कायदा व सुव्यवस्था ढासळणार नाही याची काळजी पोलिसांना घ्यावी लागत असते. पोलीस नागरिकांची काळजी घेत असताना ठिकठिकाणी पोलिसांवर काही समाज कंटकांकडून होत असलेले भ्याड हल्ले निषेधार्ह आहेत, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात नाशिकसह इतर ठिकाणी पोलिसांवर सतत समाजकंटकांकडून हल्ले होत असून पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना हे समाजकंटक जाणीवपूर्वक त्यांना लक्ष करीत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचण्याची शक्यता असून याला वेळीच रोखणे आवश्यक आहे. पोलिसांवर वाहन अंगावर घालणे, पोलिसांशी हमरीतुमरी करणे अशा पद्धतीने पोलिसांना लक्ष केले जात आहे. असे प्रकार करणाऱ्या समाजकंटकांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस या सर्व घटनांचा निषेध करत असून पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. दोषींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी तसेच ज्या ठिकाणी पोलीस कर्तव्य बजावत असतील अश्या ठिकाणी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शहर दहशतवादापासून मुक्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर शहर अध्यक्ष शरद आहेर, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शाहु खैरे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव आदींची स्वाक्षरी आहे.