खोपोली येथील सिलिकॉन कंपनीला बुधवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी अपघातात लाखो रुपयांचे मालमत्ता जळून खाक झाली. या अपघातामुळे खोपोली ते पेण आणि खोपोली ते पाली वाहतूक बंद पडली होती, तर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खोपोलीजवळील एडलॅब्स इमॅजिका येथे आलेले हजारो पर्यटक अडकून पडले होते.  या आगीत कंपनी जळून बेचिराख झाली, आगीदरम्यान कंपनीत स्फोटासारखे आवाज येत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. कंपनीतील प्लास्टिक ड्रम दूरवर फेकले जात होते. आगीचे नेमक कारण अद्याप कळू शकलेले नाही. पेण, रसायनी, खोपोली, लोणावळा, कर्जत येथील अग्निशमनदलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत होते, मात्र रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळू शकलेले नव्हते.