22 February 2019

News Flash

दुष्काळी परिस्थितीतही अर्थकारण सावरणारी रेशीम शेती!

‘रेशमाच्या रेघांनी’ हे गाव तर बदललेच पण आजूबाजूच्या गावांमध्येही या गावातल्या यशकथा अनुकरणीय ठरू पाहात आहेत.

परभणी जिल्ह्य़ातील गावात समृद्धी

सलग तीन वष्रे दुष्काळाच्या झळा होत्या तरीही या गावाची आर्थिक घडी विस्कटली नाही. ‘कापूस एके कापूस’ हा पाढाही हे गाव वाचत नाही. तुतीची लागवड करून रेशीम कोषाची थेट कर्नाटक, तेलंगणा आदी प्रांतात विक्री करणार हे गाव  आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’ हे गाव तर बदललेच पण आजूबाजूच्या गावांमध्येही या गावातल्या यशकथा अनुकरणीय ठरू पाहात आहेत.

पूर्णा तालुक्यातील देवठाणा हे जेमतेम एक हजार लोकवस्तीचे गाव. अवघ्या साडेसहाशे-सातशे मतदारांची संख्या. या गावच्या शिवारात सर्वत्र रेशीमकिडय़ांचे शेड लागलेले दिसतात. बहुतेक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून आपले अर्थकारण सावरले आहे. किमान चाळीस शेतकऱ्यांनी रेशीम कोषासाठी तुतीची लागवड केली आहे. यात दोन एकरापासून ते पाच एकरापर्यंतचा समावेश आहे. एका वर्षांत पाच लाख रुपयापर्यंत उत्पन्न घेणारे या गावचे शेतकरी आहेत आणि रेशीम शेतीतून गावाची वार्षिक उलाढाल किमान तीन-चार कोटी रुपयांच्या घरात जाणारी आहे. जितक्या सहज एखादा शेतमाल घेऊन तालुका वा जिल्ह्य़ाच्या ठिकाणी शेतकरी जातात, तितक्या सहज रेशीम कोष घेऊन बेंगळूरुच्या बाजारात या गावचे शेतकरी जातात.

सर्वात पहिल्यांदा तुतीची लागवड करून रेशीम शेतीत शिरणारे मधुकरराव जोगदंड म्हणतात, पहिल्यांदा कृषी विद्यापीठातल्या एका कार्यक्रमात रेशीमबद्दल ऐकले. कापसाला आम्ही कंटाळलो होतो. पर्याय काय म्हणून तुती लागवडीचा विचार केला. जेव्हा पहिल्यांदा या कामाला लागलो तेव्हा सर्वानीच आम्हाला वेडय़ात काढले. अगदी घरचेही म्हणाले, तुमचे तुम्ही बघून घ्या. जिद्दीने रेशीम शेतीला सुरुवात केली. सुरुवात दोन एकरपासून केली. आज पाच एकर रेशीम शेती आहे. एक तर या शेतीला ऊस-केळीसारखे भरमसाट पाणी लागत नाही. प्रत्येक वर्षांला रेशीम कोष उत्पादनाची सात ते आठ पिके घेतली जातात. एक पीक सरासरी दोनशे अंडी पुंजाचे असते. ही माहिती देणाऱ्या मधुकरराव यांच्या शेतात दर्जेदार तुतीपाल्याचे उत्पादन आढळून आले. प्रत्येक पिकासाठी लागणाऱ्या ज्या बाळअळ्या आहेत, त्या घेतल्यानंतर साधारणपणे तीन ते चार आठवडय़ात पीक घेता येते.

सध्या देवठाणा या गावाच्या शिवारात कुठेही नजर टाकली तरी रेशीम कीटक संगोपनाचे शेड उभारलेले दिसतात.

आसपासच्या गावांमध्ये रेशमाचे गाव म्हणून या गावाची ख्याती आहे. तुती लागवड करायची, हवामानानुसार अळ्यांना तुतीचा पाला खाऊ घालायचा. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घ्यायची. रेशीम कोषाची निर्मिती होईपर्यंत देखभाल घ्यायची आणि लगेच हे रेशीम कोष बेंगळूरु अथवा तेलंगणा या ठिकाणी घेऊन जायचे. ही सगळे कामे या गावातील शेतकऱ्यांच्या आता सवयीची झाली आहेत. एकटय़ा दुकटय़ाने जाण्यापेक्षा गट तयार करून शेतकरी खासगी वाहनाने रेशीम कोष घेऊन जातात. यात तरुणांची संख्या अधिक आहे. तसेच गटाने गेल्यामुळे मोठय़ा प्रमाणात रेशीम कोष जमा होतात.

अनुदान रखडले : रेशीम शेतीला रोजगार हमी योजनेत समाविष्ट केल्याने शेतकऱ्यांचा या शेतीकडे ओढा वाढला असला तरीही संबंधित विभागाचे सरकारी अधिकारी मात्र अपेक्षित सहकार्य करीत नाहीत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या वर्षी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियाच बंद पडली. निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याकडेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आणि रेशीमनिर्मितीसाठी मागाकरिता अर्थसाहाय्य देण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही रेशीम शेती लागवडीच्या अनुदानाचे पसे मिळाले नाहीत, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

नोटाबंदीने घडी विस्कटली!

सध्या बाजारातले दर व्यवस्थित आहेत पण कितीही घसरले तरीही ही शेती परवडते असे तरुण शेतकरी सुरेश सांगतो. नोटाबंदीच्या काळात मात्र या गावाला फटका बसला. एक तर आपले उत्पादन घेऊन बाहेर राज्यात जावे लागते. चेकवर भरवसा ठेवता येत नाही. त्यामुळे नोटबंदीने आमची सगळीच घडी विस्कटली होती. आता भावही वाढले आहेत. इतर गावातही आमचे पाहून लोक शेती करू लागले आहेत असे सुरेश सांगतो.

तरुणांचा वाढता ओढा

गावातल्या तरुणांचा ओढा रेशीम शेतीकडे आहे. पूर्णा तालुक्याच्या एका कोपऱ्यात आडवळणी असलेल्या या गावात रेशीम शेतीने पसा खेळतोय. कापूस किंवा सोयाबीन हातचे गेल्याने शेतकरी संकटात येतात. कधी नापिकीने कोसळल्याची धास्ती वाटते. या छोटय़ा गावात तब्बल सतरा ट्रॅक्टर आहेत. हंगामाच्या काळात हे सर्व ट्रॅक्टर कुठल्या ना कुठल्या साखर कारखान्यांना लागलेले असतात.

First Published on February 14, 2018 3:59 am

Web Title: silk farming in drought conditions