* आता सरकारला मागायचे तरी काय..
* शनिवारपासून सारे गाव उपाशी
पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्यांचा मृतदेह ओलीस ठेवून मागणीचे राजकारण करण्याची वृत्ती राज्यात फोफावत असली तरी सिंदेसूर गाव मात्र त्याला अपवाद आहे. काल शुक्रवारच्या चकमकीत दोन कर्ते तरुण ठार झाल्याने गावात आक्रोश आहे, पण त्याची जागा संतापाने घेतलेली दिसत नाही. संताप कुणावर व्यक्त करायचा आणि आता सारे गमावल्यावर सरकारकडे मागायचे तरी काय, असा हताश व सुन्न करणारा सवाल मूकबधीर सुखदेवचे वडील करतात तेव्हा सारेच गलबलून जातात.
धानोराहून १५ किलोमीटर आत गेले की, हे २६ घरांचे सिंदेसूर गाव लागते. याच गावात काल पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत रक्ताचा सडा पडला. सात जण ठार झाले. पोलिसांच्या गोळीने ठार झालेल्या सुखदेव गावडे व मुकेश हिडकोचे मृतदेह अद्याप गावात आलेले नाहीत, पण काल दुपारपासून गावात चूल पेटलेली नाही. रोज सकाळी मोहफुले वेचायला जाणे हा सध्या गावाचा दिनक्रम आहे. आज त्यात खंड पडला आहे. दिडशे लोकवस्तीचे हे गाव आजूबाजूला असलेल्या सुखदेव व मुकेशच्या घरी गोळा झाले आहे. नक्षलवादी गावाजवळ येतात, जेवण मागतात, कधी पाणी मागतात. ते देतांना पोलिसांचा ससेमिरा लागतो म्हणून काही दिवसापूर्वीच गावकऱ्यांनी आता जेवण व पाणी हवे असेल तर रात्री घरी या, आम्ही जंगलात येणार नाही, असे ठरवले. आजवर त्याचे पालनही झाले, पण काल पुन्हा चूक झाली, असे भीमा आतला नावाचा तरुण सांगतो.
सुखदेव व मुकेशसह गावातले सातजण मोहफुले गोळा करीत असतांना अचानक नक्षलवादी शेतात आले. त्यांनी या दोन तरुणांवर पाणी आणण्याची जबाबदारी सोपवली तेव्हा तेथे हजर असलेल्या सुखदेवच्या आईने तो मुकाबहिरा आहे, त्याला काम सांगू नका म्हणून नक्षलवाद्यांना विनविले, पण त्यांनी ऐकले नाही. हे दोघे पाणी घेऊन परत शेतात आले आणि गोळीबारात सापडले. उर्वरीत गावकरी एक छोटय़ा नाल्यात दडून बसले म्हणून वाचले, असे प्रत्यक्षदर्शी आज गावात सांगत होते. आई, वडील, चार बहिणी, एक लहान भाऊ मागे सोडून गेलेला सुखदेव गावात लोकप्रिय होता. सांगेल त्याची कामे तो करायचा, अशी आठवण गावकरी सांगत होते.
सुखदेवच्या साऱ्या नातेवाईकांनी घरात आक्रोश मांडलेला, पण त्याचे वडील वारलू एका कोपऱ्यात सुन्न बसून होते. सरकारकडे काही मागणी आहे का, अशी विचारणा केली तेव्हा आता काय मागायचे, संताप तरी कुणावर व्यक्त करायचा, घरातला जीव गेल्यावर काही मागायचे असते काय, असे हताश उद्गार त्यांनी काढले. राज्याच्या नागरी भागात मृतदेह ओलीस ठेवण्याचे प्रकार सर्रास होत असतांना दुर्गम भागात राहणारे व अन्याय सहन करणारे आदिवासी अशा प्रवृत्तीपासून किती दूर आहेत, याचाच अनुभव यावेळी आला.
बारावी झालेल्या व काल ठार झालेल्या मुकेशच्या घरीही तीच रडारड. यंदा मुकेशचे लग्न करायचे होते. घरातला सर्वात मोठा मुलगा तोच होता. आता आमचा आधारच गेला, असे त्याच्या बहिणी येणाऱ्या प्रत्येकाला सांगत होत्या.
सध्या या भागात बांबू तोडणीची कामे सुरू आहेत. मुकेश काल त्या कामावर जाणार होता. नंतर अचानक त्याचे मन बदलले व फुले वेचायला गेला आणि जीव गमावून बसला. दोन्हीकडच्या बंदुकीत आम्ही सापडलो आहोत, दुसरे काय, असे त्याचा मेहुणा म्हणाला. आज दुपारी या दोन्ही तरुणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनास्थळी जेवण व रक्ताचा सडा
चकमकीच्या ठिकाणाला भेट दिली असता नक्षलवाद्यांनी तयार केलेले जेवण सर्वत्र विखुरलेले दिसले. भात, भाजी आणि आंबील सांडलेली होती. अन्नाच्या बाजूलाच ठिकठिकाणी रक्ताचे थारोळे साचलेले होते. रक्ताने भरलेले हातरुमाल, दुपट्टे तसेच पडून होते. कालच्या चकमकीत टिप्पागड व धानोरा दलमचे २५ नक्षलवादी कमांडर दिवाकरच्या नेतृत्वाखाली सहभागी होते, अशी माहिती मिळाली.