News Flash

केसरकरांना राज्यमंत्रिपद; सिंधुदुर्गात जल्लोष

नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्यावर मातोश्रीच्या आशीर्वादाने राज्यमंत्रिपदाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकल्याने जिल्ह्य़ातील शिवसैनिकांनी

| December 6, 2014 02:46 am

नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्यावर मातोश्रीच्या आशीर्वादाने राज्यमंत्रिपदाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकल्याने जिल्ह्य़ातील शिवसैनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीने आनंद व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्षपद सांभाळत सावंतवाडी नगर परिषदेवर वर्चस्व प्राप्त करीत दीपक केसरकर यांनी नगराध्यक्षपदाची नऊ वर्षे यशस्वी वाटचाल केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्यानंतर सावंतवाडी नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडाही कोकणात त्यांनीच प्रथम फडकविला.
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर नारायण राणे यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून जाहीर सत्कार करीत सहकाऱ्यांची नाराजी ओढवून घेणाऱ्या दीपक केसरकर यांनी त्या वेळी शिवसेनेच्या तीन नगरसेवकांच्या बळावर सावंतवडी नगरपालिकेत वर्चस्व निर्माण करून काँग्रेसला त्याकाळी धक्का दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती, पण त्यांना मंत्रिपद मिळालेच नाही. उलट राष्ट्रवादीचे नेते नारायण राणे यांना सिंधुदुर्ग आंदण दिल्यासारखे वागत होते. त्यामुळे नारायण राणे यांनीही दीपक केसरकर यांच्या सर्व प्रकल्पांना विरोध दर्शविला. त्यातून नारायण राणे व दीपक केसरकर यांचे पटेनासे झाले. शिवाय नारायण राणे समर्थक दीपक केसरकर यांना त्रास देऊ लागल्याने दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतच राहून राणे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे नियोजन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अशा सर्व नेत्यांशी संयमाने, प्रामाणिकपणे वागणाऱ्या दीपक केसरकर यांना आघाडीच्या धर्मामुळे राष्ट्रवादीतच राहून राणेंच्या नेतृत्वामुळे अपमानास्पद वागणूक मिळत होती. शिवाय राणे यांनी राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील अनेकांना झिडकारले होते. त्या सर्वाना एकत्रित घेऊन कोअर कमिटी स्थापन करून लोकसभा निवडणुकीत राणेंचे पुत्र नीलेश राणे यांच्या पराभवासाठी एल्गार पुकारला.
नारायण राणे यांच्या वर्चस्वाला कोकणात धक्का लावण्याचे काम दीपक केसरकर यांनी जाहीरपणे केल्याने शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांना खासदार बनण्याचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपक केसरकर यांनी ५ ऑगस्टला शिवसेनेत मोठा मेळावा घेऊन प्रवेश केला.
लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांनी खासदार विनायक राऊत व जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांना साथ देत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करण्यात घेतलेल्या पुढाकाराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रिपदाच्या रूपाने आशीर्वाद दिले. आमदार दीपक केसरकर यांच्या गेल्या २५ वर्षांच्या राजकीय तपाला शिवसेनेच्या रूपाने राज्यमंत्रिपदी विराजमान होण्याचे फळ मिळाले, पण नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का लावणारा मोहरा हीच उपमा त्यामागे आहे. राणे यांच्याशी शांत, संयमी भाषेत लढा देणाऱ्या व्यक्तीचा उपयोग करून घेण्याचा उद्धव ठाकरे यांचा शब्द त्यामुळे सार्थ ठरला आहे.
दीपक केसरकर यांच्या रूपाने सिंधुदुर्गला शिवसेनेने राज्यमंत्रिपद देऊन दूरदृष्टीतून विकास करण्याची संधी दिल्याने शिवसैनिक व समर्थकांनी आज फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2014 2:46 am

Web Title: sindhudurg celebrates kerkars getting ministry
टॅग : Sindhudurg
Next Stories
1 मालेगावच्या स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा मंत्रिमंडळात
2 नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी आंदोलन
3 शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत
Just Now!
X