14 December 2019

News Flash

सिंधुदुर्ग : राणे कुटुंबाच्या राजकीय भविष्यासाठी अखेरची संधी

स्वाभाविकपणे नवा पक्ष आणि नवे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.

वेध विधानसभेचा

सतीश कामत, रत्नागिरी

कोकणच्या राजकारणातील मातब्बर नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असले तरी गेल्या दोन वर्षांत त्यांच्या राजकारणाचे फासे सततउलटेच पडत राहिले असून ही विधानसभा निवडणूक राणे कुटुंबाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अखेरची संधी ठरण्याची शक्यता आहे.

राणेंचे समर्थक भले त्यांना ‘कोकणचे भाग्यविधाते’ म्हणून नेहमी गौरवत असले तरी त्यांची ताकद कायम सिंधुदुर्ग जिल्ह्य़ापुरतीच आहे, हे शिवसेना सोडल्यानंतरच्या त्यांच्या वाटचालीत सतत सिद्ध होत गेले आहे. पण त्याही जिल्ह्य़ावर आता त्यांचा पूर्वीसारखा एकछत्री अंमल राहिलेला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत थोरले चिरंजीव नीलेश यांच्या पराभवापासून धाकटे चिरंजीव नितेश यांचा विधानसभा निवडणुकीतील विजय वगळता, अपयशाने त्यांची पाठ सोडलेली नाही. त्याच वेळी दुसरीकडे प्रमुख कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेने लोकसभेसह जिल्ह्य़ातील विधानसभेच्या तीन जागांपैकी कुडाळ आणि सावंतवाडी या दोन जागा जिंकत राणेंना चांगलाच शह दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्य़ातील कणकवलीची जागा नितेश यांनी सुमारे २५ हजार मतांच्या फरकाने जिंकली. पण त्या वेळी सेना-भाजप स्वतंत्रपणे लढले होते. या वेळी अजून तरी हे सत्ताधारी पक्ष युती कायम राखण्याच्या आणाभाका घेत आहेत. त्याचबरोबर त्या निवडणुकीत नितेश काँग्रेस आघाडीचे उमेदवार होते. या निवडणुकीत वडिलांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागणार आहे. स्वाभाविकपणे नवा पक्ष आणि नवे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. गेल्या पाच वर्षांत नितेश यांनी मतदारसंघात संघटनात्मक बांधणी चांगली केली आहे. तसेच विविध योजनांचाही धडाका लावत स्वत:ची स्वतंत्र छबी निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला आहे. त्याचा त्यांना लाभ होऊ शकतो. शिवाय, या जागेवर भाजपचा परंपरागत हक्क आहे. त्यामुळे युती कायम राहिली तर भाजपकडून माजी आमदार प्रमोद जठार किंवा राणेंचेच एके काळचे समर्थक संदेश पारकर युतीचे उमेदवार होऊ शकतात. तसे झाले तर नितेशना निवडणूक फार अवघड जाऊ नये.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राणेंचे कट्टर समर्थक सतीश सावंत हेही या वेळी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीत आहेत. त्यांना ‘स्वाभिमान’कडून कणकवलीची जागा मिळण्याची शक्यता नाही. पण गेल्या निवडणुकीत स्वत: राणे पराभूत झालेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी ते अतिशय प्रबळ दावेदार आहेत. त्याचबरोबर राणेंचे दुसरे खंदे समर्थक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत हेही तिथून इच्छुक आहेत. दोन प्रमुख चेल्यांमधला संघर्ष टाळण्यासाठी राणेंनी ही जागा पुन्हा स्वत: लढवणार की अन्य कोणाला देणार, याबाबत सध्या गूढ राखले आहे. पण सावंतांना तिथे संधी मिळाली नाही तर आणखी पाच वर्षे थांबण्याची त्यांची तयारी नाही. अशा परिस्थितीत त्यांचा हक्काचा मतदार असलेल्या कणकवलीमध्ये ते युतीकडूनही रिंगणात उतरू शकतात, अशी चर्चा आहे आणि खरेच तसे झाले तर मात्र नितेश यांच्यापुढे तगडे आव्हान उभे राहणार आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवणच्या मतदारांनी दस्तुरखुद्द नारायण राणेंना या जिल्ह्य़ात प्रथमच पराभवाची चव चाखायला लावली. तो पराभव राणे कुटुंबाच्या जिव्हारी लागला आहे. पण एकूण वातावरण लक्षात घेता राणे या वेळी पुन्हा तिथून नशीब अजमावतील का, याबद्दल शंका व्यक्त होत आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यसभेतच समाधानी राहण्याचा निर्णय घेतला तर तिथे त्यांचा वारसदार म्हणून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले थोरले चिरंजीव नीलेश यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतात, की सावंत-सामंत या जोडगोळीपैकी एकाला संधी देतात, याबद्दल संपूर्ण जिल्ह्य़ात उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूने युती झाली किंवा न झाली तरी सेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक इथे पुन्हा एकवार प्रतिस्पर्धी असणार आहेत. जिल्ह्य़ात पक्षबांधणीमध्ये अपयशी ठरल्यामुळे त्यांचे जिल्हा प्रमुखपद पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीच्या तोंडावर काढून घेतले असले तरी आपला मतदारसंघ नाईकांनी व्यवस्थित सांभाळला आहे. पण मागची विधानसभा निवडणूक किंवा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते जेमतेम दहा हजार मतांची आघाडी मिळवू शकले होते, ही त्यांच्यासाठी थोडी चिंतेची बाब आहे. राणेंकडून योग्य उमेदवाराची निवड त्यांच्यापुढे आव्हान उभे करू शकते.

जिल्ह्य़ाच्या दक्षिण टोकाकडचा सावंतवाडी मतदारसंघ एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. पण गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्या पक्षाच्या तिकिटावर भरघोस मतांनी निवडून येत पुढे राज्याच्या मंत्रिमंडळातही स्थान पटकावले. येत्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात सर्व पक्षांनी मिळून एकच उमेदवार देण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत. ‘स्वाभिमान’चे तालुकाध्यक्ष संजय परब यांचे नाव त्यामध्ये आघाडीवर आहे. सेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकरही अलीकडच्या काळात राष्ट्रवादीकडे झुकले आहेत. पण निवडणूक निकालावर परिणाम करण्याइतकी त्यांची ताकद नाही. त्यामुळे हॅट्ट्रिक करण्यात केसरकरांना फारशी अडचण येऊ नये, असे सध्याचे चित्र आहे.

या सगळ्या धामधुमीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी चर्चाही होत नाही. कारण जिल्ह्य़ात हे दोन्ही पक्ष अतिशय नगण्य झाले आहेत. त्यामुळे भाजपशी जवळीक फारशी लाभदायी न ठरलेले नारायण राणे स्वत:सह दोन्ही मुलांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीतून किती शाबूत राखतात, हाच आकर्षणाचा मुख्य विषय झाला आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी, याबाबत आमची अन्य पक्षांशी बोलणी सुरू आहेत. ते निश्चित झाल्यानंतर गणेश चतुर्थीपूर्वी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल. मी निवडणूक लढवायची की नाही, याबद्दलचा निर्णय पक्षहित डोळ्यासमोर ठेवून घेतला जाईल.

– नारायण राणे, संस्थापक-अध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

भाजपचे पक्षश्रेष्ठी देतील तो उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. इच्छुकांची गर्दी लक्षात घेता या वेळी मी निवडणूक लढवू इच्छित नाही. त्याऐवजी कोकणच्या पर्यटनासंदर्भात पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नारायण राणे यांचा पक्ष भाजपच्या कुंपणावर आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. भाजप-सेना युती कायम राहिली तर कणकवलीचा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, हे स्पष्ट आहे.

– प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष, भाजप

राजकीय चित्र

* कणकवली       काँग्रेस

* कुडाळ              शिवसेना

* सावंतवाडी       शिवसेना

First Published on August 14, 2019 3:03 am

Web Title: sindhudurg constituency political future for narayan rane family zws 70
Just Now!
X