News Flash

किल्ले सिंधुदुर्गला सागरी सफरीने मानवंदना

४ हजार किलोमीटरची नेपाळ-मुंबई सायकल रॅली त्यांनी पूर्ण केली आहे.

किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव ३५० वर्षांचा या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंबई येथून चौघांची टीम शिडाच्या बोटीसह २१ एप्रिल रोजी मालवण सिंधुदुर्ग किल्ला येथे दाखल होणार आहे. या टीममध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी भानुदास झाजम, महादेव कोयंडे, दिगंबर कोळी आणि १७ वर्षीय प्रतीक झाजम यांचा समावेश आहे, अशी माहिती किल्ले प्रेरणोत्सव समितीतर्फे देण्यात आली. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव २२ ते २४ एप्रिल या कालावधीत होत आहे. त्यानिमित्त शिवप्रेरणा यात्रेसह विविध कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाला किल्ल्याचा ३५० वर्षांचा इतिहास जागविला जाणार आहे.

याच पाश्र्वभूमीवर मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी भानुदास झाजम आणि सहकाऱ्यांनी किल्ल्याला मानवंदना म्हणून मुंबई ते मालवण सागरी सफर करीत येण्याचा निर्णय घेतला. प्रेरणोत्सव समितीनेही या उपक्रमाचे स्वागतच केले आहे. ही टीम मालवणात दाखल होताच त्यांचे किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे भव्य स्वागत केले जाणार आहे. भानुदास झाजम यांनी यापूर्वी दहा वेळा शिडाच्या बोटीने मुंबई ते गोवा प्रवास केला आहे. तर एक वेळ मुंबई ते मेंगलोर प्रवास केला आहे. भारतातील सर्वात मोठी सायकल रेस मुंबई ते गोवामध्ये त्यांनी पोर्ट ट्रस्टचे प्रतिनिधित्व केले आहे. मद्रास येथे झालेल्या ट्रायथलॉन ऑल इंडिया मेजर पोर्ट्स स्पर्धेत त्यांनी दुसरे स्थान मिळविले. याटिंग असोसिएशनतर्फे २००० मध्ये झालेल्या राष्ट्रीय याटिंग स्पर्धेत त्यांच्या टीमने दुसरे स्थान मिळविले होते. २००४ मध्ये  चेन्नई येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत त्यांनी तीन ब्राँझ पदके पटकाविली. ४ हजार किलोमीटरची नेपाळ-मुंबई सायकल रॅली त्यांनी पूर्ण केली आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. ही अभिमानाची गोष्ट असून, ही सागरी साहसी सफर म्हणजे या इतिहासाला मानवंदना असेल, असे भानुदास झाजम यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2016 2:16 am

Web Title: sindhudurg festival
टॅग : Sindhudurg
Next Stories
1 मच्छिंद्र करंडक मालवणी एकांकिका स्पर्धेचे आयोजन
2 रत्नागिरी खो-खो असोसिएशनतर्फे ऐश्वर्या सावंतचा सत्कार
3 कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत राणेंचे वर्चस्व
Just Now!
X