सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक करोनाबाधित रूग्ण सापडल्यामुळे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. ‘सिंधुदुर्गमध्ये करोना नाही पण प्रशासनाच्या हलगर्जीपणमुळे अजून एक रुग्ण सापडला’ असे नितेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

‘आंबा वाहतुक करणाऱ्या ड्रायव्हरबद्दल सांगूनही लक्ष दिले नाही’ असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. ग्रीन झोनचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गची रेडझोनच्या दिशेने वाटचाल सुरु आहे असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. त्यातील एक रुग्ण यापूर्वीच बरा होऊन घरी गेला आहे, तर दुसरा रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे.

नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. गेल्या २६ एप्रिल रोजी तो मुंबईला गेला होता. दुसऱ्या दिवशी, २७ एप्रिल रोजी तो परत आला. त्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते.

मुंबईहून आल्यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. या तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील या रुग्णाचे गाव ‘कन्टेन्मेंट झोन’ घोषित केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

आणखी वाचा- राज्य ३१ मे पर्यंत करोनामुक्त झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४८८ व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी ३२३ व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर १६५ व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत एकूण ५६६ नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ५१८ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ४८ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. विलगीकरण कक्षामध्ये आजमितीस ६७ व्यक्ती दाखल आहेत. त्यापैकी ३० रुग्ण हे विशेष कोवीड रुग्णालयात दाखल असून ३७ रुग्ण हे विशेष कोविड आरोग्य केंद्रामध्ये दाखल आहेत.