सागरी सुरक्षा व पोलीस यंत्रणा सतर्क

पाकिस्तानहून सिंगापूरच्या दिशेने जाणारे एक भले मोठे जहाज मंगळवारपासून निवती दीपगृहाच्या मागे उभे आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरला पाचरण करण्यात आले आहे.  देवबाग किनारपट्टी भागाच्या दिशेने जहाज सरकत असल्याचे मंगळवारी लक्षात आल्यावर यंत्रणा सतर्क बनली आहे. पोलीस अधिक्षक दिलीपकुमार गेडाम यांनी पोलीस, सागरी सुरक्षा यंत्रणा, पोलीस पाटील आदीची गस्त वाढविली आहे.

निवती दीपगृहाच्या मागे खडकाळ भाग आहे. या मालवण वेंगुर्ले सागरी किनारपट्टीपासून काही नॉटीकल मैल खोल समुद्रात जहाज उभे आहे. पाकिस्तान वरून सिंगापूरला जाणारे जहाज असल्याचे यंत्रणेला समजल्याने सागरी किनारी भागात गस्त वाढविण्यात आली आहे तसेच यंत्रणेसह मच्छिमारांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र खवळलेला असल्याने पोलीस, कस्टम्स विभागाची संयुक्त मोहीम व गस्ती पथक व मत्स्य विभागाच्या स्पीट नौका जहाजापर्यंत पोहोचणे अशक्य बनले आहे. तसेच जहाजाची नेमकी माहिती मिळेपर्यंत यंत्रणेने सतर्कता पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोस्ट गार्डला सिंधुदुर्ग पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

आता हवामानाचा अंदाज घेऊन कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर जहाजापर्यंत पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जहाज बंद पडले किंवा खडकाळ भागात अडकले या बाबतची खरी वस्तुस्थिती कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर जहाजापर्यंत पोहोचल्यानंतरच माहिती मिळेल असे पोलिसांनी म्हटले आहे.

मालवण पोलीस व सागरी पोलिसांनी देवबाग किनारपट्टीवरून या जहाजाची पाहणी केली असून जहाजावरील हालचालीवर देखील किनारी भागातून लक्ष ठेवण्यात आले आहे. वेंगुर्ले- मालवण तालुक्यातील सागरी किनारी सुरक्षा कवच सतर्क ठेवण्यात आले आहे. तसेच या जहाजावर वायरलेस द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण खराब वातावरणामुळे संपर्क होत नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.