प्रबोध देशपांडे

अकोला जिल्हय़ात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. सलग ५२ दिवसांपासून निरंतर रुग्ण संख्या, तर १२ दिवसांपासून दररोज करोनाचे बळी जात आहेत. त्यामुळे जिल्हय़ात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. उपाययोजनातील त्रुटी आणि उणिवा रुग्णवाढीसाठी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोल्यातील करोनाचे संकट वाढण्यास प्रशासनातील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचे स्पष्ट करत नाराजी व्यक्त केली.

अकोला जिल्हय़ात गत दोन महिन्यांपासून करोना संसर्ग सातत्यपूर्ण वाढला. शहरातील बहुतांश परिसर व्यापून घेतल्यानंतर ग्रामीण भागातही करोना वेगाने पसरतो आहे. अकोल्यात ७ एप्रिलला करोनाने शिरकाव केला, तर १३ एप्रिल रोजी शहरात पहिला बळी गेला. अगोदर परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात असताना मे व जूनमध्ये रुग्ण व मृत्यू संख्या झपाटय़ाने वाढली. २८ एप्रिलपासून सुरू झालेली रुग्ण वाढीची मालिका अद्यापही अखंडित आहे. त्यातच दुर्दैव म्हणजे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढत गेले. गेल्या १२ दिवसांपासून सलग मृत्यू होत आहेत. १८ जूनच्या सकाळच्या अहवालापर्यंत अकोला जिल्हय़ात एकूण १०९६ सकारात्मक रुग्ण, तर ५८ जणांचे मृत्यू झाले. करोनामुळे विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्हय़ात झाले. मृत्यू रोखण्यात उपचारपद्धती निष्फळ ठरत आहे. सवरेपचार रुग्णालयातील गैरव्यवस्थेवरून प्रचंड ओरड आहे. दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, किडणीची समस्या असे काही दुर्धर आजार पूर्वीपासून असल्यास मृत्यूचा धोका वाढतो. मृत्यू होणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध व इतर आजारांची पार्श्वभूमी असलेले रुग्ण जास्त आहेत. रुग्णाची परिस्थिती अत्यवस्थ झाल्यानंतर उशिराने सवरेपचार रुग्णालयात पाठवल्यावर मृत्यू झाल्याची संख्याही मोठी आहे. यावर नियंत्रणासाठी सर्वेक्षणात समोर आलेल्या शहरातील ७०० ते ८०० वयोवृद्ध व इतर आजार असलेल्यांवर देखरेख ठेवली जात आहे. नमुने घेण्याचे केंद्र वाढवण्यात आले. इतरही प्रयत्न सुरू आहेत. अद्याप तरी मृत्यू रोखण्यात यश आलेले नाही.

जिल्हय़ात करोनावर प्रतिबंधित उपाययोजना म्हणून सरकारच्या दिशानिर्देशानुसार विविध उपाययोजना झाल्या. काही स्थानिक स्तरावरही प्रयोग करण्यात आले. मात्र, करोना रोखण्यात यश आले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बैठक, आढावा व सूचनांचे सत्र सुरूच आहे. जिल्हाधिकारी जीतेंद्र पापळकर यांनी आवश्यक अनेक निर्णय घेऊन ते प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले. प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र यंत्रणांकडून त्यात कुचराई झाली. घरोघरी प्रत्येकाची तपासणी करण्याच्या निर्णय विलंबाने घेतला गेला. अगोदरच हा निर्णय घेतला गेला असता तर रुग्ण संख्या काही प्रमाणात आटोक्यात आली असती.

सुरुवातीला सर्व यंत्रणांनी हातात हात घालून कार्य केले. करोना रुग्ण वाढीने वेग धरल्यावर मात्र पकड सैल होत गेली. अपुरे साधन, आवश्यक मनुष्यबळाचा अभाव, कामाचा अतिरिक्त ताण, त्यातच लोकप्रतिनिधी, राजकीय नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचे होणारे मानसिक खच्चीकरण यामुळे यंत्रणाच विस्कळीत झाली. महापालिकेसह इतर यंत्रणांचाही केवळ औपचारिकता म्हणून आपले ‘कर्तव्य’ पार पाडण्याकडे कल राहिला.

प्रारंभीच्या काळात लोकांमध्ये प्रचंड गैरसमज आणि भीती होती. करोनाची लागण किंवा लक्षणे असूनही काही भागातील लोक समोर आले नाहीत. चाचणी करून उपचार घेण्याऐवजी घर व परिसरातच राहिल्याने संसर्ग पसरत गेला. त्यामुळे गुणाकार होऊन रुग्ण संख्या अवाढव्य झाली. करोना विरुद्धच्या लढय़ात महापालिकेकडून कठोर उपाययोजनांची अपेक्षा असताना त्यांच्याकडून प्रचंड हलगर्जीपणा झाला. आयुक्त संजय कापडणीस यांची परिस्थितीवर पकड दिसून आली नाही. प्रतिबंधित क्षेत्रात महापालिका व पोलिसांकडून नियमाची कडक अंमलबजावणी होण्याऐवजी सुरुवातीपासून ढिलाई होती. त्या क्षेत्रातील सर्व व्यवहार सुरळीत व आतले नागरिक बाहेर असे प्रकारही सर्रास घडले. त्यामुळे इतर भागातही झपाटय़ाने प्रसार होत आहे. कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग झाला. सध्या जनजीवन पूर्वपदावर येत असताना शहरातील गर्दी वाढत आहे. पावसाळी वातावरण साथीच्या आजारासाठी पोषक असते. त्यामुळे समूह संक्रमणाचा धोका अधिक गडद झाला आहे. आताच करोना आटोक्यात न आल्यास भविष्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१४ टक्के अहवाल सकारात्मक 

सवरेपचार रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू झाल्यापासून नमुने चाचणीचा वेग वाढला. १८ जूनला सकाळपर्यंत एकूण ७७१५ अहवाल प्राप्त झाले. संसर्ग नसलेल्या रुग्णांची संख्या ६६१९, तर बाधितांची संख्या १०९६ आहे. आतापर्यंतच्या चाचणी अहवालांमध्ये सकारात्मक येण्याचे प्रमाण १४.२० टक्के आहे.

५.२९ टक्के रुग्णांचा मृत्यू

जिल्हय़ातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अकोला जिल्हय़ात करोनाच्या ५.२९ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. काही दिवसांपासून सलग रुग्ण दगावत असल्याने मृत्युदर वाढला. गेल्या १२ दिवसांत २४ जणांचे बळी गेले.