मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार आषाढसरी बरसल्या. घाटघरला २४ तासांत साडेसहा इंच पाऊस पडला. भंडारदऱ्याच्या पाणीसाठय़ात जोरदार वाढ होत असून मुळा नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे.
रविवारपासून धरणाचे पाणलोट क्षेत्रासह तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सून सक्रिय झाला. पाणलोट क्षेत्रात जोरदार आषाढसरी कोसळत आहे. या पावसामुळे सहय़ाद्रीच्या डोंगररांगांतील लहानमोठे ओढे, नाले खळाळत वाहू लागले आहेत. भंडारदरा धरणात होणारी पाण्याची आवकही चांगलीच वाढली आहे. सोमवारी दिवसभरातील बारा तासांत २६६ दक्षलक्ष घनफूट नवीन पाणी आले. सायंकाळी धरणातील पाणीसाठा १ हजार ३३८ दक्षलक्ष घनफूट झाला होता. सध्या धरणातून ५३८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात घाटघर येथे आज सर्वाधिक म्हणजे १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्य ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : रतनवाडी-११३, पांजरे-१२१, भंडारदरा-६८, वाकी-७५, निळवंडे-२७, अकोले-८९.
हरिश्चंद्रगड परिसरात होत असणाऱ्या पावसामुळे मुळा नदी जोमाने वाहू लागली आहे. मुळा नदीचे पाणी रविवारी रात्री नव्याने बांधलेल्या िपपळगाव खांड येथे तलावात येऊन पोहोचले. हा तलाव एकदोन दिवसांत भरण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या पूर्व भागात आज पावसाचे प्रमाण कालच्या तुलनेत कमी होते, पण रविवारी पडलेल्या चांगल्या पावसामुळे मुळा-प्रवरा खोऱ्यांमध्ये खरिपाच्या पेरण्या मार्गी लागतील.