मुंबईपाठोपाठ सोलापूरमध्येही काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर गळती लागली आहे. काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी राजीनामे महापालिका आयुक्तांना दिले आहेत. काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा धक्का बसला आहे. राजकुमार हंचाटे, विनायक कोंड्याल, देवेंद्र कोठे, विठ्ठल कोटा, कुमुद अंकाराम आणि निर्मला नल्ला यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. महेश कोठे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय होते. मात्र त्यांनी २०१४ साली विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. महेश कोठे यांनी शिवसेनेकडून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता काँग्रेसमधील कोठेंच्या निकटवर्तीय नगरसेवकांनीदेखील निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची वाट धरली आहे. शिवसेनेत दाखल झालेले देवेंद्र कोठे हे महेश कोठेंचे पुतणे आहेत, तर कुमुद अंकाराम या महेश कोठे यांच्या भगिनी आहेत. याशिवाय विनायक कोंड्याल हे महेश कोठेंचे नातेवाईक आहेत. पक्षाला लागलेल्या गळतीमुळे सध्या सोलापूरात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.

 

सोलापूर महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेसला सध्या मोठी गळती लागली आहे. सध्या सतेत असलेल्या काँग्रेसचे सोलापूर महापालिकेत ४४ नगरसेवक आहेत. यातील ६ नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत पक्षाला धक्का दिला आहे.