जिल्ह्य़ात रविवारी दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात सहाजण ठार झाले. त्यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.
तेलंगाणामधील बोधन येथील शेख अन्वर शेख शादुल (वय २७) जुन्या बस स्थानकाजवळ फळ विक्री करून उदरनिर्वाह करतात. ते रविवारी सकाळी पत्नी परवीन बेगम (वय २५), मुलगा अब्दुल वाहेद (वय ३), मुलगी निदा अन्वर (वय २) या दोन अपत्यांसह दुचाकीवरून (एपी२५ एएच६२८८) नायगावकडे निघाले होते. दुचाकी दुपारी एकच्या सुमारास बिलोली तालुक्यातील तळणी थांब्याजवळ येताच नांदेडहून बिलोलीकडे जाणारी नवी शेवरोलेट मोटार त्यांच्या दुचाकीला धडकली. यात दुचाकीवरील चारहीजण ५० फुट हवेत उडून खाली पडून जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
अपघातात मोटारचालक सलीम हा गंभीर जखमी झाला असून त्यास नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले व तेथून नांदेडला हलविण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा केवळ सांगाडाच तुकडे रुपात शिल्लक राहिला तर मोटारच्या समोरच्या भागाचाही चेंदामेंदा झाला.
भोकरजवळ दोन ठार
जिल्ह्य़ातील भोकर येथे रविवारी भरधाव मालमोटार व मिनी ट्रकच्या धडकेत दोनजण जागीच ठार झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास मध्य प्रदेशातील इंदूर येथून आयशर मिनी ट्रक (क्र. एमपी१३ जी१९२६) हा धणे घेऊन विजयवाडाकडे जात होता. हा मिनी ट्रक भोकर-म्हैसा मार्गावरील पोमनाळा शिवारात आल्यावर समोरून येणाऱ्या भरधाव मालमोटारीने (क्र. आरजे१४-जीडी७८३९) त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात मिनी ट्रकमधील सुनील गज्जू धुरिया (वय २९, रा. बासवी, धरमपुरी, धार, मध्य प्रदेश) व जब्बार हुसेन मनसुरी (वय ३३, रा. इस्लामपूर, बांडयिा, मांडू, देवास, मध्य प्रदेश) हे जागीच ठार झाले. जब्बारचा मृतदेह दोन वाहनांमध्ये जवळपास तीन तास अडकून पडला होता. जेसीबीद्वारे एकमेकांत फसलेली वाहने बाहेर काढण्यात आल्यानंतर मृतदेह बाहेर काढता आले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने गोळा झाले. दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने वाहतूक जवळपास ५ तास ठप्प झाली होती. जेसीबीने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
भाविकांच्या जीपला अपघात; २ ठार, ११ जखमी
वार्ताहर, बीड
तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या येवला (जि.नाशिक) येथील भाविकांच्या जीपला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ११ जण जखमी असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास उदंड वडगांव फाटा येथे झाला.
 बीड-सोलापूर रस्त्यावर उदंड वडगांव फाटय़ाजवळ रविवारी सकाळी सहाच्या सुमारास  भरधाव वेगातील जीपला समोरून येणाऱ्या ट्रकने (क्र. पीएन२४ एफ३६३६) जोराची धडक दिली. नाशिक जिल्ह्य़ातील येवला येथील सोनू लहुरे हे आपल्या कुटुंबीयांसह तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी जीपमधून (क्र. एमएच१५-बीएस.३६९५) जात होते. बीडजवळ झालेल्या अपघातात जीपचालक नितीन पवार (वय ३८) आणि गाडीतील रोहिणी संजय लहुरे (वय ३०) हे दोघे जागीच ठार झाले. तर गौरव लहुरे (वय १४), अमोल झनकर (वय १४), आदित्य लहुरे (वय ६), उज्वला लहुरे (वय ३२), सोनू लहुरे (वय २८), रत्ना लहुरे (वय ३५), संजय लहुरे (वय ४०), राजू लहुरे (वय ३८), स्वरुप लहुरे (वय १) व अरुशी लहुरे (वय २) असे अकराजण जखमी आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.