20 November 2019

News Flash

महाराष्ट्रातील सहा डॉक्टरांचे लोकसभेत प्रतिनिधित्व 

महाराष्ट्रातील सहा डॉक्टर लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट झाले.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात महाराष्ट्रातील सहा डॉक्टर लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, निवडून आलेल्या सहा डॉक्टर उमेदवारांपैकी चार डॉक्टर तज्ज्ञ आहेत.

विद्यमान संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. सुजय विखे हे भाजपचे उमेदवार, तर  शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील सहा डॉक्टर राज्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतील. या सहा डॉक्टरांपैकी डॉ. सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या निवडणुकीतही विजय मिळवला होता.

डॉ. सुभाष भामरे कॅन्सरतज्ज्ञ, डॉ. सुजय विखे मेंदूविकार तज्ज्ञ, डॉ. श्रीकांत शिंदे अस्थिरोगतज्ज्ञ, डॉ. प्रीतम मुंडे त्वचाविकारतज्ज्ञ आहेत. तर डॉ. हीना गावित आणि डॉ. अमोल कोल्हे एमबीबीएस आहेत. लोकसभेत सहा डॉक्टर प्रतिनिधित्व करणार असल्याने राज्याचे आणि देशाचे आरोग्यविषयक धोरण अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.

लोकसभा निवडणुकीतील या सर्व डॉक्टर उमेदवारांची आयएमएने भेट घेऊन आरोग्याचा जाहीरनामा त्यांच्याकडे मांडला आहे. आरोग्यासाठी दरडोई उत्पन्नाच्या ३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करावा, शासकीय महाविद्यालये-रुग्णालये वाढावीत, शासकीय रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवावी, जनतेच्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत कायदा व्हावा, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे पुनरुज्जीवनकरावे या मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करून वैद्यकीय क्षेत्राकडे झालेले दुर्लक्ष दूर होईल अशी अपेक्षा आहे.

– डॉ. अविनाश भोंडवे, नियोजित अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र

First Published on May 24, 2019 5:35 am

Web Title: six doctors from maharashtra are represented in the lok sabha
Just Now!
X