सहा लाखांचे बक्षीस असलेल्या र्देकसा एरिया कमिटी सदस्य मानू उर्फ सुखदेव चैतू कोडापे याच्यासह १६ लाखांची बक्षिसे असलेल्या एकूण ६ नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हा पोलिस दलासमोर नुकतीच शरणागती पत्करल्याने नक्षल चळवळीला जबरदस्त धक्का बसला आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्हय़ातील नक्षलवादी मोठय़ा संख्येने शरण येत आहेत. गडचिरोली पोलिस दलातर्फे ‘नवजीवन योजना भाग २’ राबविण्यात आल्याने नक्षलवादी शरणागती पत्करण्यास प्रवृत्त होत आहेत. गेल्या वर्षभरात झालेल्या शरणागतीबरोबरच चालू वर्षीही हे सत्र सुरू आहे. वरिष्ठ नक्षल सदस्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, पोलिस दलाने त्यांचे पुनर्वसन घडवून आणले आहे. मार्चमध्ये र्देकसा दलम एरिया कमिटी सदस्य मानू उर्फ सुखदेव चैतू कोडापे (३६) तसेच २ लाखांचे बक्षीस असलेले माडा एरिया सदस्य मकबल ऊर्फ हर्ष ऊर्फ अतुल उर्फ सुदर्शन सत्यदेव रामटेके (२९), गट्टा दलम सदस्य कमला रैनू आत्राम (३५), सीएनएम टीम सदस्या नोनी उर्फ रासो सोमा गावडे (१९), डिव्हिजनल स्टॉफ टीम सदस्या जैलो रैनू पदा (२३) व कोरिया उर्फ लिंगा रैनू झोरे (३०)अशा एकूण १६ लाखांची बक्षिसे असलेल्या सहा जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. पोलिस दलाने आत्मसमर्पण करण्याचे केलेले आवाहन, शासनाची योजना आणि पोलिस दलाने भूखंड, आर्थिक मदत, रोजगाराची उपलब्धता, नसबंदी पुन्हा खुली करणे यासारख्या माध्यमातून आत्मसमर्पितांचे पुनर्वसन घडवून आणल्याने २०१४ मध्ये एकूण २२, २०१५ मध्ये एकूण ५६ सदस्य याप्रमाणे २०१६ चालू वर्षांत आतापर्यंत नक्षल विभागीय समितीच्या सदस्यासह विविध दलमच्या १९ सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला आहे.

आलेख वाढण्याची अपेक्षा
नक्षल आत्मसमर्पण योजनेची माहिती सामान्यांपर्यंत तसेच नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचविण्यात पोलिसांना यश आले. याचा परिणाम दीड वर्षांत ९७ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. गेल्या चार वर्षांंतील आत्मसमर्पणाचा हा सर्वाधिक आकडा आहे. येत्या काळात आत्मसमर्पणाचा हा आलेख वाढेल अशी अपेक्षा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केली.