इचलकरंजी येथे घरामध्ये सोमवारी झालेल्या गॅसच्या स्फोटात सहा जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी आसरानगर येथे रघुनाथ ठोंबरे यांच्या घरात घडली. जखमींपकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटात दोन मजली इमारतीसह शेजारील घराचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
पहाटेच्या सुमारास झालेल्या या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली, तर नागरिकांमध्ये घबराहट पसरली होती. या घटनेची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे.
या बाबत घटनास्थळ आणि पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,येथील सांगली रोडवरील आसरानगर गल्ली नं मध्ये रघुनाथ ठोंबरे (वय ६५ ) हे पत्नी विमल (वय ५५) यांच्यासह राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा, सून व नातू हे परगांवी गेल्याने त्यांची नात कु. राधिका (वय १०) ही आजी-आजोबांकडे राहण्यास आली होती.आज सकाळी विमल या पाणी गरम करण्यासाठी उठल्या होत्या. त्या शेगडी पेटवत असतानाच तेथे असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात विमल ठोंबरे, रघुनाथ ठोंबरे व कु. राधिका हे जखमी झाले. तर, घरातील प्रापंचिक साहित्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की ते राहात असलेल्या दुमजली घराची िभत कोसळली. घराचे दरवाजे, गेट आणि पत्रे उडून पडले. हे पत्रे शेजारी असलेल्या गडकरी यांच्या घरावर जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या घराचा वरचा भाग कोसळला. त्यामध्ये बापू यशवंत गडकरी (वय ६५) यांच्यासह त्यांचे नातलग संगीता सदानंद शेडे (वय ३५ मयूर सदानंद शेडे (वय ५) व प्रणव गंभीर भोईकर (वय ४ ) हे किरकोळ जखमी झाले.
स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी गर्दी जमली होती. नागरिकांनी सर्व जखमींना पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यापकी रघुनाथ व विमल ठोंबरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी गावभागचे पोलिस वअग्निशमन दलाचे जवानही तातडीने दाखल झाले. दरम्यान, गॅस गळतीने स्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन अग्निशामक विभागाने केले आहे.