लग्न समारंभ आटोपून परत येत असलेली जीप पुलाच्या कठडय़ावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार, तर ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी यवतमाळ जिल्ह्य़ातील घाटंजी तालुक्यात घडली.
घाटंजीजवळील घाटी येथील काझी कुटुंब पांढरकवडा येथे एका लग्नाला गेले होते. लग्न आटोपून परत येत असताना त्यांची बोलेरो जीप ही नुकती या गावाजवळ एका पुलाच्या कठडय़ावर आदळून झालेल्या अपघातात हसमुद्दीन काझी (६०), नगमा शेख (९), अबिना शाहा (४०), युनूस खान (४०), जुबदाबी शेख (५५) आणि शेख युनूस (४५) हे सहा जण ठार झाले. पैकी तिघे जागेवर, तर तिघे घाटंजी येथे उपचारादरम्यान मरण पावले. इतर ७ जखमींना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये चार जण घाटंजी तालुक्यातील घाटीचे, तर दोघे यवतमाळचे राहणारे होते. घटनेचे वृत्त समजताच घाटंजीच्या दवाखान्यात आणि यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात लोकांची गर्दी उसळली होती. घाटंजीच्या दवाखान्यात तर अक्षरश: हाहाकार उडाला होता. घटनास्थळी पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन जखमींना दवाखान्यात आणण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले. या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.