प्रशांत देशमुख

जिल्हाबंदी असूनही तब्बल दहा जिल्हय़ातून हजारभर किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उजेडात आला.  गावच्या सरपंचाने प्रथमच ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने सर्वाची तपासणी करीत त्यांना अखेर निवारागृहात पाठवले.

या सर्वाना रुग्णवाहिकेतून वध्र्यात आणण्यात आले. तपासणी झाल्यावर घरी जाण्याचा सल्ला मिळाल्याने हे सहाही मजूर व सरपंच कोडय़ात पडले होते. कारण त्यांच्या घरी वृद्ध आईवडील व मदत करणारे कोणीच नाही. गृहविलगीकरणाचा अर्थच कळत नसल्याने या मजुरांना वध्रेतील निवारागृहात ठेवण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना ही अडचण सांगितल्यावर त्यांनी निवारागृहातच व्यवस्था केली जाईल, अशी ठोस हमी दिली. त्यानंतर या सहाही मजुरांचा जीव  भांडय़ात पडला.

तपासणीची सुविधाच नाही..

गावात या मजुरांच्या तपासणीची सुविधाच नसल्याचे लक्षात आले. ही बाब गावातील नागरिक अरविंद वानखेडे यांनी सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ला सांगून मदतीचे साकडे घातले. तालुका आरोग्य केंद्राशी संपर्क केल्यावर त्यांनी आरोग्य सेवकास पाठविले. परंतु या सेवकाने मजुरांना आंघोळ करून आपापल्या घरी पाठवण्याचा सल्ला दिल्याने सरपंच अवाक झाले.अखेर त्यांची तपासणी झाली.

झाले काय?

वर्ध्याजवळील १२ किलोमीटरवर असणाऱ्या वडद व आजगावचे हे सर्व मजूर आहेत. विठ्ठलराव कामडी यांच्या मदतीने प्रकाश ढोले, अक्षम कोहचाडे, तुषार धुर्वे, मंगेश आत्राम व सूरज बावणे हे तरुण  मुंबईलगत तुभ्रे येथे  विद्युत जोडणीच्या कामावर होते. १ एप्रिलला ते भाजीपाल्याच्या गाडीतून नाशिकला पोहोचले. तेथून पुढे मालेगाव, मुक्ताईनगर गाठले. ४ तारखेला मालवाहू गाडीतून त्यांनी अकोला गाठले. ५ तारखेला बडनेरा येथे पोहोचले. तेथून चाळीस कि.मीचा गावापर्यंतचा प्रवास त्यांनी पायी केला. मग  पुलगाव ते देवळी व देवळी ते स्वत:च्या वडदगावला ते रिक्षाने पोहोचले, अशी माहिती विठ्ठलराव मडावी यांनी दिली.