व्याघ्र प्रकल्प सुरक्षित आहे. कारण वनाधिकारी व कर्मचारी त्यांच्या कर्तव्यावर आणि सेवाकार्यात अग्रेसर आहेत. एकीकडे पर्यटकांसाठी ‘ऑनलाईन’ पर्यटनाची अभिनव संधी उपलब्ध करून देत असताना, कोवीड-१९ च्या संकटाने जिप्सीचालक, मार्गदर्शक आणि ग्रामस्थांची भूक भागविण्यासाठी जीवनाश्यक वस्तूंचे वितरण करून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने सामाजिक दायित्व जपले हे जास्त कौतुकास्पद आहे, असा गौरवोल्लेख राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी केला. दरम्यान, ताडोबातील वाघ, बिबट व इतर वन्यप्राण्यांना करोनाची भीती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

करोनामुळे वन वैभवाचा आनंद उपभोगू न शकणार्‍या वन्यप्रेमींसाठी प्रकल्पाने ‘ऑनलाईन’ पर्यटनाचा देशातला पहिला प्रयोग सिध्द केला असून, या उपक्रमाला जनतेने उदंड प्रतिसाद दिला आहे. तब्बल सहा लाख लोकांनी घरबसल्या व्याघ्रदर्शन केले. १७ एप्रिल २०२० ला टीएटीआरने हा उपक्रम हाती घेतला. तो चार मेपर्यंत दररोज सुरू होता. त्यानंतर दर शुक्रवारी यु-ट्युबच्या माध्यमातून १५ हजार ६०० पर्यटक या सफारीचा लाभ घेत आहेत. शुक्रवार, १५ मे रोजी या ‘ऑनलाईन’ पर्यटनाच्या प्रारंभीच वनमंत्री संजय राठोड यांनी सर्वांसमोर येऊन पहिल्यांदाच संदेश प्रसारित केला.

ते म्हणाले, “करोनामुळे यंदा सर्वच राष्ट्रीय प्रकल्पांत पर्यटक जाऊ शकले नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही उतरती कळा आली. जिप्सीचालक आणि त्यांच्या परिवारावर आर्थिक संकट कोसळले. मात्र, वनविभागाच्या, विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे. टीएटीआरच्या ‘ऑनलाईन’ पर्यटन उपक्रमाला मिळालेले यशही अभिमानाचा विषय असून, त्यास माझ्या शुभेच्छा आहेत.”

दक्षिण आफ्रिकेतील क्युगर नॅशनल पार्कने असा उपक्रम राबवला होता. पण भारतात तो रूजवला ताडोबा प्रकल्पाने. यु-ट्युबच्या माध्यमातून केलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. या योजनेला कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंक असलेल्या वनाधिकार्‍यांवर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे, कोरोनाने गाव, शहरं एवढेच नव्हे, तर जंगलांनाही सोडलं नाही, सारेच ओस पडले. पर्यटन व्यवसाय बुडाला. जिप्सीचालकांपासून, तर रिसोर्ट व्यवसायिक आणि या व्यवसायाशी जुळलेल्या सार्‍यांवरच आर्थिक संकट कोसळलं. या स्थितीत ज्यांच्या चुली पेटू शकत नाहीत, अशांना शक्य ती मदत करण्याचे कार्यही वनविभागाने हाती घेतले.

धान्य, किराणा माल, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटपही करण्यात आले. काहींना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. सोबतच प्रकल्पात समाविष्ट डोणी, पाहर्मी, कोटा, पांगडी, पिपरहेटी, पांढरवाणी, बामणगाव या गावातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. कोळसा, चंद्रपूर, मूल, शिवणी, पळसगाव, खडसंगी, मोहुर्ली या वनपरिक्षेत्रातील ९७ गावांमध्ये जनजागृती केली. ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने धान्य व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय ‘वाईल्ड कॅप्चर’ संस्थेच्या वतीने बफर क्षेत्रातील ३२ अतिसंवेदनशील गावांतील लोकांना धान्य वाटप केले. याच गावातील प्रत्येकी ५ स्थानिकांची एक टीम तयार करून, त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांच्याकडून वन गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कार्यासाठीही वनमंत्र्यांनी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची पाठ थोपटली.

या उपक्रमांची माहिती देत असतानाच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी सांगितले की, “कोरोनामुळे वन्यप्राण्यांना कोणताही धोका नसून, यंदा वन्यजीवांच्या तृष्णातृप्तीतही कुठलाच अडथळा आलेला नाही. अशासकीय यंत्रणा आणि फाउंडेशनमुळे या संकटावर ताडोबा प्रकल्पाने मात केली आहे.”