उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहा निष्णात वकिलांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबीयांसह पक्षकार आणि त्यांच्याकडून न्यायिक लढय़ाचे धडे घेणाऱ्या कनिष्ठ वकिलांमध्ये दु:खाचे वातावरण असून या वकिलांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनच्या वतीने एक लाखाची मदत दिली जाणार आहे.

उस्मानाबाद येथील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. दत्तात्रय सिद्राम बारखडे-पाटील यांचे अलिकडेच निधन झाले. जिल्हा विधिज्ञ मंडळाचे माजी पदाधिकारी अ‍ॅड. नारायण वडणे (वय ४५) यांना घशात त्रास होत असल्याने त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा अचानक मृत्यू झाला. अ‍ॅड. बापूसाहेब विठ्ठलराव गंजे व अ‍ॅड. विनोद गंगावणे यांचा एकाच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच बरोबर अ‍ॅड. भारती ठवळे यांचे बुधवारी करोनाने निधन झाले. लग्नानंतर एलएलबीचे शिक्षण घेऊन मागील काही वर्षांतच त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला होता. उमरगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करणारे अ‍ॅड. रवींद्र बिराजदार यांचेही करोनामुळे निधन झाले. या वकिलांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने एक लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत वाढवावी अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले यांनी केली आहे.