22 November 2017

News Flash

सहा नक्षलवादी चकमकीत ठार

एकाच चकमकीत तब्बल सहा नक्षलवाद्यांना ठार करून त्यांचे मृतदेह ताब्यात मिळवण्याचा पराक्रम गडचिरोली पोलिसांनी

खास प्रतिनिधी, चंद्रपूर | Updated: January 21, 2013 2:25 AM

एकाच चकमकीत तब्बल सहा नक्षलवाद्यांना ठार करून त्यांचे मृतदेह ताब्यात मिळवण्याचा पराक्रम गडचिरोली पोलिसांनी केला आहे. रविवारी पहाटे झालेल्या या चकमकीमुळे नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सी-६० च्या पथकांचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ठार झालेल्यांमध्ये जहाल नक्षलवादी शंकरचा समावेश आहे.
अहेरी तालुक्यातील सिरोंचा मार्गावरील गोविंदगावात शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांची बैठक आयोजित केल्याची माहिती सी-६० च्या पथकांना मिळाली होती. सी-६०च्या दोन पथकांनी त्यासाठी सापळा रचला होता. शनिवारी सायंकाळी सुमारे शंभर नक्षलवाद्यांनी या गावाच्या बाजूला जंगलात मुक्काम ठोकला होता. रात्री एक वाजता बैठक संपल्यानंतर हे नक्षलवादी परतताना दबा धरून बसलेल्या सी-६०च्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.  सुमारे अर्धा तास चाललेल्या या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये विभागीय समितीचा सदस्य व अहेरी दलमचा सचिव शंकर ऊर्फ मुलेश्वर लकडा, विनोद ऊर्फ चंद्रय्या कोडापे, मोहन कोवासे, झुरू मट्टामी, गीता उसेंडी व नीता कोडापे यांचा समावेश आहे. या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त केला.

First Published on January 21, 2013 2:25 am

Web Title: six naxalit killed in cross firing
टॅग Crime,Naxxalit