गडचिरोलीतील कसनसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सेवारी गावाजवळच्या जंगलात नक्षलवाद्यांनी तळ ठोकला असून ते प्रत्येक गावात जाऊन बैठका घेत असल्याची माहिती पोलिसांना दोन दिवसांपूर्वी मिळाली होती. छत्तीसगढच्या सीमेला लागून असलेल्या सेवारीच्या जंगलात पोलिसांनी शनिवारी सकाळपासून शोधमोहीम राबवली होती. रविवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांची नक्षलवाद्यांशी गाठ पडली व चकमक सुरू झाली. सुमारे एक तास चाललेल्या गोळीबारानंतर नक्षलवाद्यांनी बांडे नदीच्या पात्रातून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. मात्र आठपेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मोठा शस्त्रसाठा जप्त
घटनास्थळावरून एक कार्बाईन, ३०३ बनावटीची एक बंदूक, बारा बोअरची तीन पिस्तुले, १३ हातबॉम्ब व काडतुसांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.  
पुण्याच्या जवानाचा संशयास्पद मृत्यू
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हय़ातील नक्षलवादग्रस्त असलेल्या माणिकगड पहाडावरील पाटण पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या राज्य राखीव दलाच्या विशाल बबन हेटे (२३) या जवानाचा रविवारी संशयास्पद मृत्यू झाला. त्याने स्वत:जवळच्या बंदुकीतून गोळय़ा झाडून आत्महत्या केली असे पोलिसांचे म्हणणे आहे. काही प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार या जवानाला पाठीवर तसेच मानेवर गोळय़ा लागल्या असून सहकाऱ्याशी झालेल्या भांडणातून त्याची हत्या झाली. हा जवान पुण्याचा निवासी होता.