नगर शहरातील एका परप्रांतीयासह संगमनेरमधील ३ तर पारनेरातील २ अशा सहा जणांचे करोनासंसर्ग तपासणी अहवाल आज, शनिवारी सकारात्मक आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनबाधितांची संख्या २८२ झाली आहे. चौघे जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची संख्या आता २३७ झाली आहे.

जिल्हा सरकारी रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली. मूळचा झारखंड येथील असलेल्या आणि नगर शहरातील सारसनगर भागात राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. कर्करोगावरील उपचारासाठी तो मुंबई येथे प्रवास करून आला होता.

संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष आणि जोर्वे येथील ४५ वर्षीय पुरुषालाही करोनाची बाधा झाली.

आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने या तिघांना उपचारासाठी दाखल  झाले करण्यात आले होते.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना करोनाची लागण झाली. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात या दोघी आल्या  होत्या.

याशिवाय नगर शहराच्या सारसनगर व बोलेगाव भागातील प्रत्येकी एक असे दोघे तर संगमनेरमधील दोघे असे एकूण चार जण करोनामुक्त झाले.

मुंबईतून रुग्ण नगरला पाठवला

कर्करोगाच्या उपचारासाठी गेलेल्या सारसनगर भागातील परप्रांतीयाची मुंबईत तपासणी करण्यात आली, त्याचा अहवाल मुंबईतच सकारात्मक आल्याचे व तो करोनाबाधित असल्याचे तेथेच स्पष्ट झाले. मात्र मुंबईतील रुग्णालयाने त्याला अहवाल घेऊन नगरला धाडले. नगरला आलेल्या या परप्रांतीयांने जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हा अहवाल सादर केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या परप्रांतीयाला सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.