लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : वाशिम जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी आणखी सहा करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २१ झाली. सध्या १३ जणांवर उपचार सुरू आहेत.

वाशिम जिल्ह्यातील बोराळा हिस्से येथील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील चार, शेलुबाजार एक आणि कारंजा एक असे एकूण सहा रुग्णांचा करोना तपासणी अहवाल १० जून रोजी सायंकाळी सकारात्मक आला. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील रुग्ण संख्या २१ झाली. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. उर्वरित १३ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. पालघर येथून मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव येथे आलेल्या एका महिलेचा अहवाल ९ जूनला सकारात्मक आला होता. त्यानंतर आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी सहा रुग्णांची भर पडली.