जिल्ह्यत करोनाबाधित सहा रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे आता करोनाबाधितांचा आकडा चौदावर गेला आहे. दोन परदेशी नागरिक व त्यांच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्ती करोनाबाधित आढळल्या. परदेशी व्यक्तींमुळे करोनाची साखळी तोडतांना प्रशासनाला अडचणी येत आहेत.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या दोघा परदेशी नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यापैकी एक इंडोनेशियाचा तर दुसरा जिबुटीचा नागरिक आहे. या दोघांच्या संपर्कोत शहरातील मुकुंदनगर भागातील दोन व संगमनेर येथील दोन अशा स्थानिक असणाऱ्या चार नागरिकांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यामुळे येथील करोनाबाधितांची संख्या चौदा झाली असून एकाचा तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. बुथ रुग्णालयामध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.

मरकजच्या कार्यक्रमानंतर काही विदेशी नागरिक शहरातील मुकुंदनगर, जामखेड, नेवासे येथे वास्तव्याला होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या काही संशयित रुग्णांच्या घशातील स्राव आरोग्य विभागाने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू शोध संस्थेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ५१ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी सहा जणांचा अहवाल सकारात्मक आढळून आला. तर ४५ जणांचे अहवाल नकारात्मक आढळून आले आहेत. एकूण चौदा करोनाबाधितांपैकी सात व्यक्ती करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना बाधा झाली. एकूण ८० अहवाल पाठविण्यात आले होते. त्यापैकी २९ अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

शहरातील मुकुंदनगर भागातील दोन व्यक्ती या परदेशातून आलेल्या करोनाबाधितांच्या संपर्कात होत्या. त्यामुळे त्यांनाही बाधा झाली. मात्र त्या दोन्ही परप्रांतीय आहेत. एक मूळची राजस्थानातील कोटा येथील, तर दुसरी मध्यप्रदेशातील भोपाळची आहे. त्या परदेशी व्यक्तींबरोबर भाषांतरकार म्हणून काम करत होत्या. आज सहा जणांचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर प्रशासनाने उपाययोजना सुरु केली आहे. परदेशी करोनाबाधित व्यक्तींमुळे संगमनेरच्या दोघांना बाधा झाली आहे. ते रहात असलेला रहिमतनगर व नायकवाडपुरा हा भाग सील करण्यात आला आहे. तेथील पंधरा जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

जिल्ह्यत गेल्या चार दिवसात करोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. मात्र बाधित व्यक्ती एकतर परदेशातून आल्या आहेत किंवा थेट त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाच करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे. करोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मात्र नागरिकांनी नियमाचे पालन करावे. घराबाहेर पडू नये. संगमनेर व मुकुं दनगर परिसरात प्रतिबंधात्मक आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन येण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलिसांना देण्यात आले आहेत. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून जिल्हा रुग्णालयात येऊ न तपासणी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे.

४९० व्यक्तींची तपासणी, ६१ जणांचे अहवाल येणे बाकी

आरोग्यबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊ न त्यांचे स्राव तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. आतापर्यंत ४९० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यांचे ६१ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. बाधित आढळलेल्या सर्व रुग्णांची तब्येत स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

दिल्लीला गेलेल्यांची माहिती मिळाली

दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यR मास गेलेल्या सर्व नागरिकांची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची नावेही उपलब्ध झाली आहेत. या कार्यR मातील चौघा विदेशी नागरिकांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या चार स्थानिक नागरिकांना करोनाची बाधा झाली. कार्यR मात सहभागी झालेल्या ४६ जणांना शोधण्यात प्रशासनास यश आले असून ३५ नागरिकांना यापूर्वी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. उर्वरित ११ जणांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याखेरीज दिल्ली येथे खासगी कामासाठी गेलेल्यांची नावेही पोलिसांना मिळाली. तसेच दिल्लीहून रेल्वे व विमानाने प्रवास केलेल्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.