कर्नाटकातील बागलकोटजवळ जीप व कर्नाटक एसटीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात जीपमधील सहा जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश असून सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ सीना गावचे रहिवासी आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता विजयपूर-बागलकोट रस्त्यावर कोर्ती (ता. बेळगी) येथे घडली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, दारफळ सीना गावचे ८ जण कर्नाटकातील शिवमोगा येथे कॅन्सरवरील उपचाराकरिता गेले होते. उपचार करुन परत येत असताना आज सकाळी ७ वाजता बागलकोट-विजयपूर रस्त्यावर क्रुजर (एमएच ४५ एन ४३२७) व कर्नाटक एसटी महामंडळाची बस (केए २५ ३१३८) या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात क्रूजरमधील सहाजण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमी राहूल मुळे व अर्जुन जाधव यांना बागलकोट येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सहापैकी चार मृतांची ओळख पटली आहे. रजनी हनुमंत शिंदे, विजया अनंत शिंदे, पांडुरंग साळुंखे (सर्व रा. दारफळ) व नागेश राऊत (उपळाई, ता माढा) अशी मृतांची नावे असून दोन मृतदेहांच्या तोंडावर जबर मार लागल्याने त्यांची ओळख अद्यापपर्यंत पटली नव्हती. या घटनेमुळे दारफळवर गावावर शोककळा पसरली आहे.