नगर व बीडमधील हल्ल्यात एका महिन्यात सहा जणांचा मृत्यू

मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

नगर : नगर आणि लगतच्या बीड जिल्ह्य़ात बिबटय़ांनी दहशत निर्माण केली आहे. गेल्या महिनाभरात बिबटय़ांच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले आहेत. शेतकऱ्यांची अनेक दुभती जनावरे मृत्युमुखी पडली. अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे शेतीच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. काही गावांमधून गस्त सुरू झाली आहे. नगर शहराजवळ बिबटय़ाचा उपद्रव प्रथमच जाणवू लागला. मात्र बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यात वन खाते आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.

बिबटय़ाचा उपद्रव पश्चिम महाराष्ट्रासह जळगाव, धुळे, सोलापूर, नाशिक, नगर, बीड या जिल्ह्य़ांत आहे. बिबटय़ाचा समावेश वन्यजीवांच्या अधिसूची एकमध्ये असल्याने त्याचा बंदोबस्त करण्यात अनेक अडचणी-मर्यादा जाणवत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी अधिसूची एकमधून बिबटय़ाला वगळण्याची मागणी केली आहे. वन खात्यातील अधिकारी जंगलातील व शेतातील बिबटय़ा असा फरक करून उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणीचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे उसाच्या आश्रयाला आलेले बिबटे बाहेर येऊ लागले आहेत. बिबटय़ांच्या ‘ब्रीडिंग सीझन’ सुरू आहे. त्यातून हल्ले वाढत आहेत. मात्र आता उसाचे क्षेत्र कमी आहे अशा ठिकाणीही बिबटे आढळत आहेत, त्यांचे हल्ले होत आहेत. शेतात सध्या कापूस वेचणीचे काम सुरू आहे. पिकाला पाणी दिले जात आहे. शेतीची कामे जोरात सुरू आहेत, अशाच वेळी बिबटय़ांचे हल्ले होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर तालुक्यातील अनेक गावांतून शेतकऱ्यांनी गस्तही सुरू केली आहे. नगर जिल्हा बिबटय़ाप्रवण आहे, परंतु नगर शहराजवळ त्याचे अस्तित्व यापूर्वी आढळले नव्हते. मात्र तो आता शहराच्या हद्दीवर येऊन पोहोचला आहे. शहराजवळ चांदबिबी महाल ऐतिहासिक ठिकाण आहे. सकाळ-संध्याकाळ नागरिक तेथे फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी जातात. याच ठिकाणी बिबटय़ांचे दर्शन झाल्याने वन विभागाने नागरिकांना या भागात जाण्यास मज्जाव केला आहे.

जिल्ह्य़ाच्या गोदावरी, प्रवरा नदीच्या पट्टय़ात अनेक बिबटे आढळतात, परंतु आता नगर, पाथर्डी, पारनेर, कर्जत या दुष्काळी पट्टय़ातही बिबटे आढळत आहेत. बिबटय़ाच्या लागोपाठ हल्ल्यात पाथर्डीतील तीन लहान मुले मृत्युमुखी पडली. त्यानंतर लगतच्या आष्टी तालुक्यात गेल्या आठवडाभरात झाले तीन जण ठार झाले. पाथर्डीतील घटनेने बिबटय़ा नरभक्षक झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एका बिबटय़ाची चर्चा होती,  प्रत्यक्षात वनविभागाच्या पिंजऱ्यात तीन बिबटे कैद झाले. तरीही त्यानंतर बिबटय़ाचे हल्ले सुरू आहेत. त्याचवेळी लगतच्या आष्टी तालुक्यातही आठवडाभरात तिघांचा बळी घेतला. नगर जिल्ह्य़ात वाडी-वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. बिबटय़ाही आता शेतातील पिकांच्या आश्रयाला आलेला आहे. उसाचे क्षेत्र वाढत असल्याने त्याला लपण्यास आणि भक्ष्य मिळण्यास सुलभ होते.

आता ऊस तोडणीचे काम वेगात सुरू झाले आहे. परिणामी हल्लेही वाढले आहेत. दुग्ध उत्पादनात नगर राज्यात अग्रेसर आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात दुभती जनावरे मृत्युमुखी पडल्यास शेतकऱ्यांची उत्पन्नावर परिणाम होतो. बिबटय़ाच्या उपद्रवाच्या तक्रारी वाढल्यानंतर अनेकदा पिंजरे उपलब्ध नसल्याचे वनविभागाला सांगावे लागते. त्यातून नागरिकांत आणखी असंतोष निर्माण होतो. ही परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी आहे.

२ हजार ९०४ दुभत्या जनावरांचा फडशा

बिबटय़ांच्या हल्ल्यांमध्ये गेल्या चार वर्षांत ८ जणांचा मृत्यू झाला, तर ५५ जण जखमी झाले. शेतकऱ्यांकडील २९०४ संख्येने पशुधन जखमी व मृत्युमुखी पडले. शेतकऱ्यांना भरपाई मिळत असली तरी होणारे नुकसान अधिक असते. भरपाईसाठी गेल्या एप्रिल २०२० पासून अनुदान उपलब्ध झाले नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

बिबटय़ा पकडण्यासाठी वन विभागाकडे पुरेसे पिंजरे नाहीत, प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. आता हलक्या वजनाचे पिंजरे उपलब्ध होतात. ते वन विभागाने तयार करून घ्यावेत. गर्भगिरीच्या डोंगररांगांत झालेले हल्ले पाहता बिबटय़ा नरभक्षक झाला काय, असे वाटते. शेतात काम करणाऱ्यांवर हल्ले होत असल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे. बिबटय़ाची शिकार करण्यास आपला विरोध आहे. मात्र प्रशिक्षित नेमबाजांना पाचारण करून, बिबटय़ांना बेशुद्ध करून ज्या ठिकाणी बिबट सफारी आहे तिथे पाठवावेत. आपण वनमंत्री असताना बेलवंडी येथे सफारी केंद्र मंजूर केले होते, परंतु नंतर त्याला निधी न मिळाल्याने ते सुरू झाले नाही.

      – बबनराव पाचपुते, आमदार श्रीगोंदे,  माजी वनमंत्री.

बिबटय़ाचा केंद्र सरकारच्या अधिसूची एकमध्ये समावेश असल्याने त्याला पकडण्यावर, बंदोबस्त करण्यावर बंधने पडतात. पकडलेले बिबटे राखीव क्षेत्रात सोडायला हवेत. बिबटय़ा पकडण्यासाठी पिंजऱ्यात वनविभाग भक्ष्य म्हणून शेळी असते. ही शेळीसुद्धा शेतकऱ्याकडील असते. त्याची भरपाई वनविभाग शेतकऱ्यांना देत नाही. या शेळीपासून शेतकऱ्याला उत्पन्न मिळते. 

– आशुतोष काळे, आमदार, कोपरगाव.

पाथर्डीमध्ये हल्ले करणारा बिबटय़ा नरभक्षक आहे का, याबद्दल अद्याप खात्री पटली नाही. सध्या ऊस तोडणी सुरू आहे तसेच बिबटय़ांचा ‘ब्रीडिंग सीझन’ सुरू आहे. हल्ले होण्यामागे या घटनाही कारणीभूत आहेत. नगर जिल्ह्य़ात किती बिबटे आहेत, याची गणना अद्याप झालेली नाही. जंगलातील वन्यप्राण्यांची गणना केली जाते, जंगलाबाहेरील प्राण्यांची गणना केली जात नाही. वन्यजीव कायद्यान्वये बिबटय़ा संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे बिबटय़ांना पकडताना अतिशय खबरदारी घ्यावी लागते. याबाबत धोरणात्मक निर्णयाची आवश्यकता आहे.

      -आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक, नगर.