धुळ्याच्या पिंपळनेर परिसरातील सहा ऊसतोड मजूर गुरुवारी सायंकाळी गुजरातमध्ये झालेल्या ट्रक अपघातात ठार झाले. १३ जण जखमी झाले असून गंभीर जखमींवर व्यारा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात राहणारे बहुतांश जण दरवर्षी गुजरातमध्ये ऊस तोडणीच्या कामासाठी जात असतात. यंदाही सुरत जिल्ह्यातील बारडोली परिसरात असलेल्या साखर कारखान्यातंर्गत ऊस तोड कामासाठी साक्री तालुक्यातून अनेक मजूर गेले होते. गळिताचा हंगाम बंद झाल्याने ऊस तोडीचे कामही बंद झाले. कामच न राहिल्याने मजुरांनी आपआपल्या गावांकडे परतण्यास सुरूवात केली.
गुरुवारी दुपारी एका ट्रकमधून सुमारे २८ मजूर ओझर- हिंदोला मार्गे पिंपळनेरकडे येत असताना सोनगडपासून २६ किलोमीटरवरील ओझर गावाजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरून कोसळला. ट्रकखाली दाबले गेल्याने सहा मजूर जागीच ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये मालीबाई तोगडय़ा सूर्यवंशी (५०), अनिता अनिल नाईक (५), खाटूबाई सोंडल्या नाईक (२७), संतोलिया जंगल्या नाईक (६०, सर्व राहणार मादलपाडा), विमलबाई बन्सी नाईक (३५, जामखेल, ता. साक्री), अलका दाबिक्या नाईक (३०, रायनपाडा, ता. साक्री) यांचा समावेश आह़े