शाळेच्या खोलीमध्ये जुगार खेळत असताना अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांना शिक्षण विभागाने निलंबित केले.
वसमत येथील पूर्णा साखर कारखान्याच्या परिसरात असलेल्या शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान लहाने व त्यांचे सहकारी शिक्षक एस. टी. नरवाडे, एस. आर. कांबळे, एस. एन. साळवे, आर. यू. शिंदे, एन. ए. सोनटक्के हे सर्व विद्यालयातील वर्गखोलीत ८ ऑगस्टला पत्त्याचा तिरट्र नावाचा जुगार खेळत असताना वसमत ग्रामीण पोलिसांनी त्यांना पकडले होते. शाळेत शिक्षकच जुगार खेळत असल्यामुळे हा विषय जिल्हाभर चांगलाच गाजला. मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची जामिनावर सुटका झाली. या शिक्षकांकडून १ लाख ६८ हजार ९१० रुपयांचा माल जप्त केला होता.
या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक लहाने, िशदे साळवे, कांबळे, नरवाडे, सोनटक्के यांना निलंबित केल्याचे आदेश बजावले. या विद्यालयात पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग चालतात. या ठिकाणी १३ शिक्षकांची नियुक्ती आहे. सुमारे ४३५ विद्यार्थी संख्या आहे. मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांना निलंबित केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, या शिक्षण संस्थेकडून कोणते पाऊल उचलले जाते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.