सोलापूर शहर व जिल्ह्यत मागील जुलै महिन्यात करोना आटोक्यात आणताना एकूण ४४ हजार ९८४ चाचण्या घेण्यात आल्या. यात ५९९३ बाधित रुग्ण सापडले. तर १९५ रुग्णांना प्राण गमवावे लागले. दुसरीकडे ३७४० रुग्ण करोनामुक्त झाले.

शहराच्या तुलनेत जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे गेल्या महिनाभरात दिसून आले. ग्रामीण भागात ३२९१ तर शहरात २७०२ रुग्ण सापडले. मात्र शहरात १०९ आणि ग्रामीण भागात ८६ रुग्णांचा मृत्यू झाला. महिनाभरातील एकूण १९५ मृतांमध्ये १३० पुरुष आणि ६५ महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांमध्ये शहरातील पुरुष १५२४ तर ११७८ महिला आहेत. १७७४ रुग्ण करोनामुक्त झाले. ग्रामीण भागात बाधित रुग्णांमध्ये १९९७ पुरुष तर १२९५ महिला आहेत. शहर व जिल्ह्यतील महिनाभरात नव्याने आढळून आलेल्या एकूण ५९९३ बाधित रुग्णांमध्ये ३५२१ पुरुष आणि २४७३ महिला आहेत. करोनामुक्त झालेल्या एकूण ३७४० रुग्णांमध्ये १५१९ महिलांचा समावेश आहे.

महिनाभरात झालेल्या एकूण ४४ हजार ६०० चाचण्यांच्या तुलनेत १३.४३ टक्के चाचण्या सकारात्मक आढळून आल्या. तर करोनामुक्त रुग्णांची टक्केवारी ६२.४० एवढी आहे. मृत्यूचे प्रमाण ३.२५ टक्के आहे.

तथापि, शहरात शनिवारी ९०३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त होऊ न त्यात ६५ बाधित रुग्ण सापडले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५०५० वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ३६४ झाला आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३०६१ आहे. दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमधील बाधित रुग्णसंख्या ३६५३ तर मृतांची संख्या १०३ झाली आहे.