सातारा जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी सोळा कलमी कार्यक्रम हाती घेऊन साताऱ्याचे प्रसिध्द उद्योगपती पांडुरंग शिंदे यांनी सातारा लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. महायुतीकडे उमेदवारी मागितली होती. परंतू औटघटकेच्या सावळय़ा गोंधळात ही जागा रिपाइंकडे गेल्याने आपल्याला अपक्ष म्हणून जनतेसमोर परिवर्तनातून विकास अन् विकासातून सामाजिक उध्दार अशी भूमिका घेऊन आपण जात असल्याचे पांडुरंग शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
सातारा लोकसभेच्या जागेसाठी १८ उमेदवार दावेदार आहेत. परंतू, आपण उच्च शिक्षित, अनुभवी व स्वच्छ चारित्र्याचे उद्योजक असल्याने मतदार राजा निश्चितच आपल्याला पसंती देईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. आपण १९७५ चे मुंबईच्या आयआयटीमधील एमटेक असून, आपला दहा कंपन्यांचा उद्योग समूह आहे. सातारा नजीकच्या पाटखळ हे आपले गाव असून, तेथेही आपले उद्योग उभे आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी आपण राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित झालो आहोत. विविध दहा सामाजिक संस्थांवर आपण पदाधिकारीही असून, लायन्स या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सातारा जिल्ह्यातील पहिले गव्हर्नर होण्याचा मान मिळाल्याचे समाधान व्यक्त करताना, सारासार विचार करता जनहितार्थ निवडून देण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.