विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अगदी सहज अवगत व्हावी, या हेतूने यंदाचे सहावीचे इंग्रजी पुस्तक ‘माय इंग्लिश बुक सिक्स’ अतिशय आगळ्यावेगळ्या पध्दतीने तयार करण्यात आले आहे. प्रथमच इंग्रजी पुस्तक कलानुरूप, साहित्यिक, तंत्रज्ञानयुक्त मोबाईलवर दिसेल, अशा पध्दतीने तयार करण्यात आले आहे. छोटय़ा छोटय़ा उपक्रमातून भाषा शिकविण्याचे तंत्र पुस्तकात वापरले आहे. संवाद, चर्चा, गटचर्चा, मुलाखत, अभिनय करणे अशी विविध उपक्रम विद्यार्थ्यांना करवून शिकविण्याचे तंत्र यात देण्यात आले आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२००५ आणि बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम-२००९ अनुसार राज्यात ‘प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२’ तयार करण्यात आला. या अभ्यासक्रमाची कार्यवाही २०१३-१४ या शालेय वर्षांपासून क्रमश: सुरू झाली. त्या अंतर्गत यंदा वर्ग सहावीचे इंग्रजी पुस्तक ‘माय इंग्लिश बुक सिक्स’ तयार करण्यात आले आहे. हे पुस्तके विद्यार्थ्यांना आवडेल व त्याच्या ज्ञानकक्षा रुंदावतील, असा दावा करण्यात येत आहे. पुस्तकाची काही वैशिष्टय़े सांगितली आहेत. ऑर कोडप्रणाली म्हणजे तात्काळ परिणाम प्रणाली होय. तंत्रज्ञानाच्या काळात आपली मुले व पुस्तके मागे पडू नये म्हणून या प्रणालीचा वापर केला गेला आहे.
पुस्तकातील कोणत्याही पाठातील जास्तीची माहिती किंवा सविस्तर ज्ञान मिळविण्यासाठी क्विक रिस्पॉन्स त्या पानाखालीच देण्यात आला आहे. स्मार्ट फोनच्या मदतीने हे कोड स्कॅन केल्यास पुस्तकातील त्या त्या घटकातील विस्तृत माहिती मोबाईलवर दिसणार आहे, त्यामुळे साधे सोपे तंत्रज्ञान वापरून पुस्तकाला तंत्रज्ञानयुक्त करण्यात आले आहे. ज्ञानरचनावादावर भर देत या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थी त्यांच्या पूर्वज्ञानाच्या आधारावर या पुस्तकाच्या सहाय्याने ज्ञानरचना करू शकणार आहे. इंग्रजी भाषा अध्ययन सोपी व सहजतेने होणार आहे. हे पुस्तक विविध उपक्रमयुक्त करण्यात आले असून छोटय़ा छोटय़ा उपक्रमातून भाषा शिकविण्याचे तंत्र यात वापरले आहे. संवाद, चर्चा, गटचर्चा, मुलाखत, अभिनय करणे अशी विविध उपक्रमे विद्यार्थ्यांना करवून शिकविण्याचे तंत्र यात आहे. या सर्वातून विद्यार्थ्यांना स्वत:ला इंग्रजी भाषा अवगत करता येणे सोपे होणार आहे.
भाषा शिकण्याकरिता लिसनिंग, स्पिकिंग, रिडिंग, राईटिंग, स्टडी, स्कील आणि भाषा स्कील, अशा विविध कौशल्यांवर आधारित साध्या सोप्या कृती देण्यात आल्या आहेत. नाविन्यपूर्ण गोष्टी, कविता, कथा व इतर साहित्याच्या माध्यमातून या सर्व कौशल्यांचा विद्यार्थ्यांचा विकास निश्चित घडेल. विद्यार्थ्यांला आकर्षित करणारी पुस्तकाची रचना, रंग व चित्रांचा जास्तीत जास्त वापर व त्यांच्या वयानुसार संवाद साधणारी चित्रे आहेत. विशेषत: तारा, पॅड्री, कुकू, बिट्ट, टोंटो व मिया ही चरित्रे विद्यार्थ्यांची फार ओळखीची व लाडाची होतील, अशी आशा आहे. भाषा शिकण्याकरिता विद्यार्थ्यांना पुरेसा सराव व वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे हे जाणून घोकंमपट्टी करण्यास कुठेही पुस्तकात वाव न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात आला आहे. भविष्यातील आव्हाने विद्यार्थ्यांना समर्थपणे पेलता यावीत, असा पाठय़क्रम तयार करण्यात आला असून अभ्यासक्रमापुढे स्वयंअध्ययनाला प्रेरणा, तसेच स्वअभिव्यक्तीला संधी मिळणार आहे. आतापर्यंतच्या अभ्यासक्रमात परीक्षांचे दडपण, स्मरणशक्ती व पाठांतरालाच जास्त महत्व होते, परंतु यंदापासून इंग्रजी विषयाकरिता ओपन बुक टेस्ट घेण्याचे ठरविले आहे. परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना पुस्तके संदर्भ पुस्तक म्हणून वापरायला दिले जाणार आहेत. अशा विविधता व वैशिष्टय़पूर्ण इंग्रजीच्या पुस्तक निर्मिती मंडळात चंद्रपूरच्या लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाचे शिक्षक अनिल पेटकर यांचा सहभाग होता. ते स्वत: ज्ञानरचनावादी, तंत्रस्नेही, विविध नाविन्यपूर्ण कृती शिक्षणावर भर देऊन शिकवितात. ते जिल्ह्य़ात इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत असून नुकतीच त्यांची शाळासिध्दी समितीवर सदस्य म्हणून निवड झालेली आहे.