भाविकांना दर्शन होणार सुलभ

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा बहुचíचत स्कायवॉक कुठल्याही प्रकारच्या उद्घाटनाचा डामडौल न करता सुरू करण्यात आला त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बेशिस्तीमधे सुरू असलेल्या दर्शन रांगेस एकप्रकारची शिस्त लागली गेली. यामुळे आता भाविकांना दर्शन सुलभ होणार आहे.

गेल्या महिन्यापासून ‘स्कायवॉक’चे काम सुरू होते परंतु अत्यंत कासवगतीने हे काम सुरू होते त्यामुळे संपूर्ण दर्शन रांग ही प्रदक्षिणा मार्गावरून कोमटे गल्लीमधील बोळामधून वळविण्यात आली होती. त्यामुळे विठ्ठलांच्या दर्शन रांगेमधे मोठय़ा प्रमाणावर गोंधळ उडत होता. यामध्ये अनेक भाविकांची घुसखोरीदेखील होत होती त्यामुळे अनेकवेळा धक्काबुक्कीचे प्रसंग निर्माण झाले होती त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या बंदोबस्तामधून प्रदक्षिणा मार्ग तसेच बोळामधून विठ्ठलांची पदस्पर्श दर्शन रांग ही दर्शन मंडपामधे जात होती.

दर्शन रांग प्रदक्षिणा मार्गावर असताना प्रांताधिकारी संजय तेली तसेच मंदिर समितीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र कुलकर्णी तसेच पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी मोठय़ा प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा घेऊन सदरची दर्शन रांग ही प्रदक्षिणा मार्गावरील कोमटे गल्ली येथील बोळापासून नामदेव मंदिराच्या बोळामधे वळवून कासार घाट येथील स्कायवॉकच्या मार्गाजवळ नेऊन स्कायवॉकवरून दर्शन बारी सुरू करून दिली. यावेळी मोठय़ा संख्येने पोलिसांचा फौजफाटा हा रस्त्यावर उतरून भाविकांना स्कायवॉकजवळ घेऊन जाण्यास मदत करीत होता. यामध्ये देखील कुठेही घुसखोरी होणार नाही याची जाणीवपूर्वक पोलिसांकडून खबरदारी घेतली जात होती.

गुरुवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी सदरच्या स्कायवॉकच्या कामाची पाहणी करून साधारणत शनिवारी हा स्कायवॉक भाविकांसाठी खुला करण्यात येईल असे संकेत दिले होते. परंतु वेळेपूर्वीच मंदिर समितीने सदरचे काम पूर्ण करून घेतल्याने हा स्कायवॉक भाविकांसाठी खुला करण्यात आला.