मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली पंचायत समितीच्या समोरच्या रस्त्यावरील चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या उड्डाण पुलाचा स्लॅब व गर्डर शुक्रवारी सकाळी कोसळला. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे गेल्या महिन्यात संरक्षकभिंतीला भगदाड पडले असतानाच आता नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचा भाग कोसळल्यामुळे कणकवलीत अक्षरशः खळबळ उडाली आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली शहरांमध्ये ४५ पिलर ओव्हर ब्रिजचे काम गेले दोन वर्षे सुरू आहे. या ब्रिजला जोडणाऱ्या एका भागाच्या संरक्षक भिंतीचा भाग गेल्या महिन्यात कोसळला होता यामुळे जवळपास पंधरा दिवस राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या.

आज कडकडीत ऊन असताना पुलाचा अर्धवट स्लॅब कोसळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय रस्ते विकास महामार्ग प्राधिकरणाकडून ठेकेदाराला असलेले पाठबळ लक्षात घेता हे प्रकरण आता मोठा चर्चेचा विषय ठरणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटनाच्या वेळेस शंभर वर्षे टिकेल, असा काँक्रीटचा महामार्ग आम्ही तयार करू असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला कणकवलीच्या कोसळलेल्या भिंती आणि ओवरब्रिजने हरताळ फासला.