06 July 2020

News Flash

जायकवाडीस पाणी मिळू शकते, पण..!

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार कोणत्या स्थितीत कसे पाणीवाटप व्हावे, याचे सूत्र ठरले. त्यानुसार गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा एकत्रित आढावाही घेण्यात आला. मात्र, प्राधिकरणाचा निर्णय सरकारला मान्य

| November 4, 2014 01:55 am

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार कोणत्या स्थितीत कसे पाणीवाटप व्हावे, याचे सूत्र ठरले. त्यानुसार गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा एकत्रित आढावाही घेण्यात आला. मात्र, प्राधिकरणाचा निर्णय सरकारला मान्य आहे की नाही, याचे धोरण निश्चित झाले नाही. नगर व नाशिकमधील जलसंपदा विभागातील पाण्याची आकडेवारी गोळा करण्यात आली. मात्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कटुता निर्माण होईल, या भीतिपोटी ती जाहीर करण्यास जलसंपदा विभागातील कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी नकार दिला.
नगर-नाशिक जिल्ह्यांतील पाण्याची आकडेवारी चार प्रकारांत एकत्रित करण्यात आली. नुकत्याच झालेल्या बठकीत पाण्याची अपरिहार्य गरज काढण्यात आली. पिण्याचे व उद्योगाला लागणारे पाणी, बाष्पीभवन, जिल्हाधिकाऱ्यांकडून होणारे आरक्षण, जलाशयावरून होणारा वैयक्तिक उपसा, गाळामुळे झालेली घट असे टप्पे करण्यात आले. रब्बी हंगामातील व शिल्लक पाणी असे विभाजन करण्यात आले. मात्र, ही आकडेवारी सांगितली तर वाद वाढतील, असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना वाटते.
तयार केलेल्या आकडेवारीच्या आधारे सरकारला अहवाल पाठविला. पाणीवाटपासाठी कोणते सूत्र वापरायचे, झालेला निर्णय सरकारला मान्य आहे काय, याची तपासणी होणे बाकी असल्याने केलेली आकडेमोड गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरकारला सादर केली. निळवंडे धरणात काही पाणी शिल्लक असले तरी ते मिळेल का, याचे उत्तर दिले जात नाही.
दरम्यान, जलसंपदा विभागाचा कारभार नक्की कोणत्या मंत्र्याकडे ते अजून ठरले नाही. या खात्याचा कारभार सध्या मुख्यमंत्र्यांकडेच आहे. त्यामुळे पाण्याशी संबंधित महत्त्वाचे व धोरणात्मक निर्णय त्यांच्या पातळीवरच होणार असले, तरी ते नक्की केव्हा होतील, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
जायकवाडी समितीचे ‘झोपा काढा’ आंदोलन
आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी सोडावे, या मागणीसाठी जायकवाडी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयासमोरच झोपा काढा आंदोलन करण्यात आले. वारंवार निवेदने देऊनही अधिकारी झोपा काढत असल्याने हे आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता कार्यालयासमोर चटई अंथरून शेतकऱ्यांनी पथारी पसरली. जायकवाडीतून उच्चपातळी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची तरतूद नाही. त्यामुळे या विषयीचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असे गोदावरी मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी सांगितले.
या दोन्ही बंधाऱ्यांत पाणी नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वारंवार निवेदने देऊनही अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, अधिकारी काही काम करीत नसल्याची हिरडपुरी बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची भावना आहे. जलसंपदा सचिवांशी पत्रव्यवहार करूनही काम होत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पाइपलाइन केली. त्यांना पाणी मिळाले नाही. परतीच्या पावसाने हात आखडता घेतल्याने ऊसपीक घेता आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बंधाऱ्यात बुडक्या घेऊन तहान भागवावी लागत आहे.
अधिकाऱ्यांनी प्रकल्पात पाणी द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. जायकवाडी प्रकल्पातील पाणी पुढील बंधाऱ्यात सोडण्याची तरतूद नाही. प्रकल्पास ३० दशलक्ष घनमीटर पाणी लागेल. मात्र, हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्यास अंमलबजावणी शक्य असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जयाजीराव सूर्यवंशी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात लाभक्षेत्रातील काही गावांचे सरपंचही सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2014 1:55 am

Web Title: sleeping agitation for jayakwadi water
टॅग Aurangabad
Next Stories
1 जवखेडा निषेधार्थ बेंबळीमध्ये मोर्चा, जळकोटला ‘रास्ता रोको’
2 पेपरफुटीत बडे मासे?
3 खरीप उत्पादकता घटली, रब्बीचीही ८ टक्केच पेरणी!
Just Now!
X