बांधकाम साहित्याच्या दरात २० ते २५ टक्के वाढ
मराठवाडय़ातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अनेक भागातील बांधकामांची गती मंदावली असली, तरी बांधकाम साहित्याच्या दरात मात्र २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. दुष्काळामुळे बाजारात मंदीचे सावट आहे.
सदनिका वा व्यापारी गाळ्यांना मागणी नाही आणि दुसरीकडे बांधकाम साहित्यात मोठी वाढ झाल्याने या क्षेत्रातील व्यावसायिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. दोन महिन्यांपूर्वी ४ हजार ५०० ते ४ हजार ६०० रुपयांना ३ ब्रास वाळू मिळत होती, पण आता त्यासाठी ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. नांदेड जिल्हा प्रशासनाने वाळू धक्क्यांचा लिलाव अजूनही केला नाही. साठा करणाऱ्या वाळूमाफियांनी आता अडवणूक सुरू केली आहे. त्यामुळे वाळूच्या दरात वाढ झाली आहे. वाळूप्रमाणेच गिट्टी, मुरुम, वीट या साहित्यातही २० ते २५ टक्के दरवाढ झाली. दोन महिन्यांपूर्वी ५ हजार ६०० रुपयांना मिळणाऱ्या गिट्टीसाठी आता ६ हजार ३०० ते ६ हजार ५००, मुरुमासाठी १ हजार ८०० रुपये द्यावे लागत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. अन्य साहित्याच्या तुलनेत विटांचे दरही चांगलेच कडाडले आहेत. पाच हजार विटांसाठी १४ ते १५ हजार रुपये लागत होते, पण आता एक मालमोटार विटांसाठी (पाच हजार नग) २० हजार रुपये लागतात.
नांदेड शहरालगत असलेल्या मारतळा, वाजेगाव, कामळज, वासरी, आमदुरा या गावात वीट तयार होते. उत्पादन होत असले तरी मागणी घटल्याचे सांगून या क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी सध्या परळी (जिल्हा बीड) येथे तयार होणाऱ्या विटांना मागणी मोठी असल्याचे सांगितले. सुमारे १५-२० वीटभट्टय़ांवर हजारो मजूर काम करतात. सामान्यांना स्वत:चे घर मिळावे, या दृष्टीने अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी गृहकर्ज त्वरेने मिळावे या साठी विविध योजना जाहीर केल्या. पूर्वीच्या तुलनेत गृहकर्जाचे व्याजदर कमी झाले. पण आíथक मंदीमुळे ग्राहकांनी बँकांकडे पाठ फिरवली. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याची बाब एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी मान्य केली.