चार महिन्यांत केवळ एक लाख नागरिकांचे लसीकरण

वसई : करोनावरील प्रतिबंध उपाय म्हणून पालिकेने लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे, मात्र अपुऱ्या लशींच्या साठय़ामुळे लसीकरण हे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. २५ लाख लोकसंख्या असलेल्या वसई-विरार शहरात चार महिन्यांत केवळ एक लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

शहरात पालिकेने जानेवारी महिन्यापासून लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे.  लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली व त्यानंतर १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील व्यक्ती व ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. तर १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण सुरू केले आहे.

शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात जाऊन पोहचली आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरात पुरेश्या प्रमाणात लशींचा साठा उपलब्ध झाला नसल्याने अनेकांना रांगा लावूनही लस मिळत नाही तर एका केंद्रावरून लस मिळविण्यासाठी दुसऱ्या केंद्रावर धावाधाव करावी लागत आहे.

सध्या स्थितीत पालिकेच्या क्षेत्रात १ लाख २९ हजार ६२० इतके लसीकरण पूर्ण झाले आहे.यातील १लाख ०३ हजार १९० जणांचा पहिला डोस घेतला आहे. तर २६ हजार ४३०  दुसरा डोस झाला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या आकडेवारी नुसार शहराच्या २५ लोकसंख्येपैकी केवळ १ लाख नागरिकांनाच याचा लाभ मिळाला म्हणजेच टक्के इतक्याच नागरिकांचे लसीकरण झाले आहे.तर दुसरीकडे ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. अशा नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आतापर्यंत शहरात झालेले लसीकरण

                         पहिला डोस     दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी    ९५५३            ८२७३

फ्रंटलाईन वर्कर्स    ८४३७             ३३७२

१८ ते ४४ वयोगट   ६८०९               —

४५ व ५९ वयोगट    ३५६५४         ३६९४

६० वर्षांवरील         ४२७३७         ११०९१

एकूण                 १०३१९०         २६४३०