|| मोहनीराज लहाडे

नगर : राज्यातून लघू व मध्यम क्षेत्रातील औद्योगिक उत्पादनाच्या निर्यात वाढीसाठी नगरसह पंधरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या १५ जिल्ह्यांमधून सध्या कोणत्या उत्पादनांची निर्यात केली जाते, त्यात वाढीसाठी कोणते उपाय करावेत, आणखी कोणत्या उत्पादनांची निर्यात करता येईल, त्यास चालना देता येईल याचा आराखडा तयार केला जाणार आहे. या आराखड्यानुसार निर्यात वाढीसाठी ‘जिल्हा केंद्र’ विकसित केले जाणार आहे. नगर जिल्ह्यातून वीज क्षेत्रातील उत्पादने व औषधांच्या निर्यातीवर भर दिला जाणार आहे.

नगर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, नांदेड, बीड, जालना, लातूर व परभणी या जिल्ह्यांचा निर्यात वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. राज्य सरकारने वस्त्रे, अभियांत्रिकी वस्तू,  कृषी उत्पादने व प्रक्रिया पदार्थ, खाद्यपदार्थ, स्वयंचलित वाहने व त्यांचे सुटे भाग, औषधे व रसायन ही क्षेत्रे निर्यात वृद्धीसाठी अधोरेखित केली आहेत. यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर निर्यात प्रचालन समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. राज्य पातळीवर उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्यात वाढीसाठी सल्ला देणारी, तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती अशा दोन स्वतंत्र समित्या कार्यरत होतील. तर, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असतील. या समित्यांवर औद्योगिक संघटना-संस्था -निर्यातदारांचे प्रतिनिधी, संबंधित सरकारी कार्यालयाचे अधिकारी यांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यातील सध्या निर्यातीमध्ये राज्याचा एकूण वाटा वाढवणे, लघु व मध्यम उद्योगातून निर्यातवृद्धीस चालना देणे, निर्यातक्षम उद्योगांच्या अडचणी व तक्रारी सोडवणे, यासाठी या समित्या काम करतील, असे उद्योग विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यातून सध्या विजेच्या उत्पादनातील स्वीचगिअर, सीमलेस ट्यूब,  स्वयंचलित क्षेत्रातील उत्पादने, प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी), औषधे आदी उत्पादने निर्यात केली जातात. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, कृषीप्रक्रिया पदार्थ यांची निर्यात होऊ शकते, असे उद्योग विभागाला वाटते. नगर जिल्ह्यातून थेट निर्यात होण्यापेक्षा मध्यस्थांमार्फत निर्यात करण्याचा कल औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी स्वीकारला आहे.

नगरमधील ३८४ उद्योगातून  निर्यात

नगर जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाचे एकूण उद्योग १९ हजार १८२ आहेत. त्यातील केवळ ३८४ घटकांमधून निर्यात होते. त्यांचा वाटा राज्यात ०.४९ टक्के आहे तर मोठ्या ११४ उद्योगांपैकी केवळ ६ उद्योगातून निर्यात होते.  हा वाटा ५.२६ टक्के आहे. नगरच्या औद्योगिक क्षेत्रात ऑटोमोबाईल क्षेत्रात १४२ घटक आहेत.

– संतोष गवळी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नगर.