येत्या २५ जून रोजी देशातील स्मार्ट सिटी योजनांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समारंभपूर्वक होत असला तरी त्याबाबतचा तपशील केंद्रीय नगरविकास विभागाकडून सोलापूर स्मार्ट सिटी योजनेच्या यंत्रणेला अद्याप मिळालेला नाही. तीन दिवसांवर हा कार्यक्रम आला असताना त्यापासून सोलापूर महापालिका व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीही अनभिज्ञ आहे.

याबाबत पालिका आयुक्त विजय काळम यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून आपण केंद्रीय नगरविकास विभागाच्या संपर्कात आहोत. परंतु, अद्यापि त्यांच्याकडून कार्यक्रमाचा तपशील मिळालेला नाही. केंद्रीय नगरविकास विभागाशी दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधण्यात तांत्रिक अडचणींमुळे संवाद साधता येत नसल्याने काळम यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. तशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

पुण्यात २५ जून रोजी सायंकाळी चार ते साडेपाच या वेळेत बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडासंकुलात पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रातील प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती असलेला स्मार्ट सिटी योजनेच्या शुभारंभाचा सोहळा सोलापूरच्या नागरिकांना पाहता यावा म्हणून येथील शिवछत्रपती रंगभवनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. संपूर्ण देशात शंभर स्मार्ट सिटींपैकी केवळ सोलापूर व सुरत या दोन स्मार्ट सिटींमध्ये मोठय़ा सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांना कार्यक्रम पाहण्याची सोय करण्यात आली आहे.

उर्वरित शहरांमध्ये स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेऊन मर्यादित स्वरूपात म्हणजे प्रत्येकी ३० ते ३५ व्यक्तींना कार्यक्रम पाहता येणार आहे. ही माहिती पालिका आयुक्त विजय काळम यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. सोलापुरात २५ जून रोजी पुण्यातील मुख्य समारंभाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२च्या दरम्यान हुतात्मा उद्यानात अमृत योजनेंतर्गत हाती घेतलेल्या विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे.

या समारंभाची माहिती लगेचच केंद्रीय नगरविकास विभागाला पाठविण्याच्या सूचना आहेत, असे आयुक्त काळम यांनी सांगितले. शहरात केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून एक कोटीचा निधी खर्च करून सहा उद्यानांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

अत्याधुनिक यंत्रणा सज्ज

पंतप्रधान मोदी हे स्मार्ट सिटीतील नागरिकांच्या भावनाही जाणून घेणार आहेत. परंतु नेमक्या कोणत्या स्मार्ट सिटीतील नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे हे समजले नाही. त्याची माहिती ऐनवेळी मिळू शकेल. त्याअनुषंगाने सोलापुरात अत्याधुनिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे आयुक्त काळम यांनी नमूद केले.