नाशिकमध्ये स्मार्ट पार्किंगची चाचणी

शहरातील वाहनतळाची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच ठिकाणी रस्त्यालगत तर २८ ठिकाणी रस्त्यावर वाहनतळाचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यातील वाहनतळ सुरू करण्यापूर्वी त्याची चाचणी शुक्रवारी महापालिकेच्या मुख्यालयात करण्यात आली. या ठिकाणी वाहनतळाचे दर, वाहनांसाठी मोकळी जागा आदी माहिती डिजिटल फलकाद्वारे मिळणार आहे. तसेच ही स्मार्ट वाहनतळे भ्रमणध्वनी अ‍ॅपशी जोडली जाणार आहेत. जेणेकरून वाहनधारकांना पालिकेचे निकटचे वाहनतळ कोणते, दर, गाडीसाठी जागा आहे की नाही, याची माहिती भ्रमणध्वनीवर उपलब्ध होईल.

वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या कमालीची वाढत आहे. वाहनतळाची व्यवस्था नसल्याने बहुतांश वाहने रस्त्यावर उभी केली जातात. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून महानगरपालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ करता येईल. त्या अनुषंगाने पालिका आयुक्त यांनी अंदाजपत्रकात स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण ३३ ठिकाणी वाहनतळाचे नियोजन केले आहे. त्या अंतर्गत पाच ठिकाणी रस्त्याच्या लगत, तर रस्त्यावर २८ ठिकाणी वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनतळाच्या या सुविधेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण करण्यात येणार आहे. वाहनतळाच्या या व्यवस्थेची चाचणी महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात करण्यात आली. आयुक्त मुंढे यांच्यासह स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी उपस्थित होते. या व्यवस्थेचे संचालन कशा पध्दतीने होईल, याची सर्व माहिती संबंधितांनी जाणून घेतली.

..पण खिशावर भार

आधुनिक सेवा देणाऱ्या वाहनतळावर वाहन उभे करताना खिशावर बोजा पडणार आहे. प्रत्येक तासासाठी वाहननिहाय वेगवेगळ्या दराची आकारणी केली जाईल. त्यानुसार कार, जीप, टॅक्सी आणि तीनचाकीसाठी प्रतितास २० रुपये, दुचाकी १०, सायकल पाच, बस आणि मालमोटारीसाठी प्रत्येकी ४० रुपये असा दर राहील. रस्त्यावरील वाहनतळाचा वापर तुलनेत महाग पडेल. रस्त्यावरील वाहनतळात मोटार, जीप, तीन चाकी वाहनासाठी प्रतितास ३० रुपये, दुचाकीसाठी १५, सायकलसाठी पाच, बस आणि मालमोटारीसाठी १०० रुपये प्रति तास आकारले जाणार आहे.

भ्रमणध्वनी हा मार्गदर्शक

आधुनिक पध्दतीने कार्यान्वित होणाऱ्या या वाहनतळाद्वारे वाहनधारकांना स्मार्ट सुविधा मिळणार आहेत. हे वाहनतळ डिजिटल राहील. वाहनतळ भ्रमणध्वनी अ‍ॅपशी जोडले जाणार आहे. वाहनधारकाला ज्या रस्त्यावर वाहन  उभे करावयाचे आहे, त्याला भ्रमणध्वनीवर सर्व माहिती उपलब्ध होईल. महापालिकेचे वाहनतळ कोणते, वाहनतळाचे दर, गाडीसाठी जागा आहे की नाही याची माहिती भ्रमणध्वनीवर मिळेल. बारकोड पध्दतीचे देयक, अवघ्या ३० सेकंदात वाहनतळातून बाहेर पडण्याची सुविधा आदींचा अंतर्भाव आहे. राजीव गांधी भवन, रामायण बंगल्यातील वाहनतळ या ठिकाणी त्याची प्रात्यक्षिके करण्यात आली.