विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपकडून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थक समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्मिता वाघ यांना संधी मिळाली आहे. याबाबत २३ जानेवारी रोजी शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अमळनेर विधानसभा मतदार संघातून स्मिता वाघ यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, या मतदार संघातून अनिल पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यात अनिल पाटील यांचा पराभव होऊन अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी विजयी झाले होते. निवडून आल्यानंतर चौधरी यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. या सर्व राजकीय घडामोडींनंतर भाजपच्या अधिकृत उमेदवारास पाडण्यासाठी स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांनी सहकार्य केल्याची चर्चा सुरू झाली. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आल्याचे सांगितले जाते.
भाजपमध्ये अनेक वर्षांंपासून सक्रीय असलेल्या स्मिता वाघ यांनी पक्षाने दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत राजकीय जीवनात आपल्या कामाचा ठसा उमटविला. २००२ मध्ये प्रथम त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली. त्यात सर्वाधिक मतांनी त्या विजयी झाल्या होत्या. सातत्याने तीन वेळा अमळनेर मंगरुळ जि. प. गटातून निवडून आलेल्या वाघ जिल्हा परिषदेत भाजपचे गटनेतेपद सांभाळत आहेत. तसेच महाराष्ट्र महिला मोर्चाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. भाजपच्या राष्ट्रीय माहिती कार्यकारिणीच्या त्या सदस्य आहेत. राजकारणासोबत वाघ यांनी सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी शैक्षणिक जीवनापासूनच त्या संबंधित आहेत. १९९६-९७ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडून उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 4:01 am