वसई-विरारला १५ टन अतिरिक्त साठा उपलब्ध

वसई : वसई विरार शहरात निर्माण झालेल्या प्राणवायूच्या तुटवडा आता सुरळीत झाला आहे. शहराला अतिरिक्त प्राणवायू मिळत असून रिफिलिंग केंद्रांनी आपली क्षमता वाढवली आहे. प्राणवायू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळवून देण्यासाठी टँकर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वसई विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून प्राणवायू (ऑक्सीजन) चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता. करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने प्राणवायूची मागणी कमालीची वाढली होती. त्यात वसईतील प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे कच्चा माल येईनासा झाल्याने प्राणवायू निर्मिती मंदावली होती.

प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्याच्या उद्योग मंत्री आदिती तटकर यांना पत्र लिहून शहरातील स्थिती निदर्शनास आणून दिली होती आणि प्राणवायूचा अधिक पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शहराला अतिरिक्त प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होत आहे. शहरात १५ टन अतिरिक्त प्राणवायू उपलब्घ करून देण्यात आला असून त्यात वाढ होत असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले.

वसईच्या स्पीड ऑक्सीजन प्रायव्हेट लिमिटेड या रिफिलिंग कंपनीने आपली क्षमता वाढवली आहे. आमच्याकडे पुर्वी २० टनांची साठवणुकीची क्षमता होती ती आता आम्ही २६ टन एवढी वाढवली आहे. प्राणवायू संपताच नव्याने साठा केला जात आहे. पुर्वी दिवसाला १ टँकर प्राणवायूची मागणी होते आता दिवसाला ३ ते ५ टँकर लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेने प्राणवायूचा पुरवठा विनाअडथळा व्हावा यासाठी प्रभारी साहाय्यक आयुक्त मोहन संखे आणि प्रभारी साहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. द्रव ऑक्सीजन मिळण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे.