15 November 2019

News Flash

‘सूनबाई’च्या विजयाचा जल्लोष!

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी पाच वर्षे केलेल्या परिश्रमामुळेच विजय मिळवला अशी डहाणुत चर्चा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रामध्ये भाजपची एकहाती आलेली सत्ता तसेच भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून डहाणूच्या सून असलेल्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल डहाणूत जल्लोष करण्यात आला.

विजयानिमित्त डहाणूत भाजपचे नगराध्यक्ष भरतसिह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी डहाणूरोड रेल्वे स्थानक ते सागरनाका भाजप कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी तब्बल अर्धा तास फटाक्यांच्या आतषबाजीने डहाणू परिसर दणाणून गेला.  या वेळी नगराध्यक्ष भरत राजपूत, नगरसेवक जगदीश राजपूत, रमेश काकड, विशाल नांदलस्कर, निमिल गोहिल, रुकसाना मजदा आणि भाजपच्या शहरातील महिला पदाधिकारी सहभागी झाले होते. नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी भाजपच्या केंद्रातील विजयाच्या शुभेच्छा देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या डहाणूच्या सून स्मृती इराणी यांना मिळालेल्या विजयाबद्दल डहाणूकरांनी जल्लोष केल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. तसेच पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले, शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित याची मिरवणूक नंतर काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मिरवणुकीत नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

पाच वर्षांच्या परिश्रमाचे फळ

वाडा : स्मृती इराणी चित्रपटसृष्टीत काम करीत असताना डहाणुतील चिकू बागायतदार झुबिन इराणी यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर त्यांचा विवाह झाला व त्या डहाणुच्या स्नुषा झाल्या.दरम्याच्या काळात स्मृती यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी स्मृती इराणी यांच्या लोकप्रियतेकडे बघत त्यांना केंद्रीय राजकारणात प्रवेश दिला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही इराणी यांना मंत्रीमंडळात घेण्यात आले. अमेठी लोकसभा मतदार संघाची जबाबदारी इराणी यांच्याकडे सोपविण्यात आली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी पाच वर्षे केलेल्या परिश्रमामुळेच विजय मिळवला अशी डहाणुत चर्चा आहे.

First Published on May 25, 2019 12:12 am

Web Title: smriti irani victory over the celebration