आरोपी काँग्रेस कार्यकर्ती; वधूवर सूचक मंडळाच्या नावाखाली अनैतिक प्रकार

लातुरात वधूवर सूचक मंडळाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीच्या तस्करीची टोळी उजेडात आली आहे. या प्रकरणातील आरोपी ही काँग्रेसची कार्यकर्ती असल्याने त्याला राजकीय वळण लागले आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

महिनाभरापूर्वी लातूर शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व एका महिलेवर संशय व्यक्त केला. संशयाचे धागेदोरे लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला अन् पोलिसांच्या हाती अतिशय खळबळजनक माहिती आली. शहरातील पूनम शहाणे ही महिला वधूवर सूचक मंडळ चालवीत असे व या माध्यमातून मुलींना पळवून नेऊन त्यांचे लग्न लावून देत असे व त्या बदल्यात वराकडील मंडळींकडून पसे उकळत असे. पूनम शहाणे व तिच्यासोबतच्या दहा जणांना पोलिसांनी अटक केली व न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. हे वधूवर सूचक मंडळ किती वर्षांपासून चालू होते, या मंडळाच्या अंतर्गत आतापर्यंत किती विवाह लावण्यात आले, नेमका किती आर्थिक व्यवहार झाला, यात दहा जणांव्यतिरिक्त आणखी किती मंडळी गुंतलेली आहेत, या बाबींचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे.

वधूवर सूचक मंडळाच्या नावाखाली  मुलींचे अपहरण करून हा प्रकार राजरोस सुरू होता. पूनम शहाणे ही महिला काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती असल्यामुळे काँग्रेसच्या विरोधातही लातूर व परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

गुरुवारी विधानसभेत लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पूनम शहाणे ही काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती असून गेल्या कित्येक वर्षांपासून तिचा हा व्यवसाय सुरू होता. तो पोलिसांनी उघडकीस आणल्याचे सांगितले. त्यावर लातूरचे आ. अमित देशमुख यांनी प्रत्युत्तर देत राज्यातील चौदा जिल्हय़ांत महिलांची तस्करी होते आहे. गृहखाते नेमके काय करीत आहे? एखाद्या पक्षावर आरोप लावून सरकारला सुटका करून घेता येणार नाही असे ते म्हणाले. त्यावर पालकमंत्र्यांनी सरकार गंभीरपणे महिला तस्करीचा सर्व बाजूंनी तपास करीत आहे. या बाबीतील सर्व तपशील उजेडात आणून संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता, २०१६ मध्ये नऊ तर २०१७ मध्ये आतापर्यंत १४ अशा एकूण २३ अल्पवयीन मुलींचा अद्याप तपास लागलेला नाही. यासंबंधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांचा तपास सुरू आहे. पूनम शहाणे व त्यांच्या साथीदारांना अटक केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीचे सांगली जिल्हय़ात लग्न लावून देण्यात आले होते हे उघड झाले आहे. आणखी असे किती प्रकार त्यांच्याकडून घडले याचा तपास चौकशीअंती लागेल. हे एकच रॅकेट आहे की आणखी काही रॅकेट कार्यरत आहेत? यासंबंधीही पोलीस तपास करीत असल्याचे ते म्हणाले.

वधूवर सूचक मंडळे हादरली

शहर व परिसरात इच्छुक वधूवरांकडून ठरावीक रकमा घेऊन नावनोंदणी करणारी वधूवर सूचक मंडळे या प्रकरणाने चांगलीच हादरली आहेत. गेल्या चार दिवसांपासून यातील बहुतेकांनी आपल्या कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. नसते बालंट आपल्यावर येऊ नये यासाठी त्यांनी सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. पूनम शहाणे या आपल्याकडील मुलींची छायाचित्रे गरजूंना समाजमाध्यमावर  पाठवून लग्नासाठी एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची मागणी करीत असत हेही आता उघडकीस येत आहे.