मेळघाटातील वाघांची शिकारीच्या घटना आणि सर्पमित्रांचाच सापाच्या विषाच्या तस्करीतील सहभाग उघड झाल्याने वन विभाग प्रचंड हादरला आहे. शिकारी टोळी आणि सापांच्या विषाची तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी विदर्भात आपली पाळेमुळे घट्ट रोवली असून दोन्ही तस्करी प्रकरणांचे धोगेदोरे आंतरराष्ट्रीय तस्करी टोळ्यांपर्यंत जुळलेले असल्याने वन विभागापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वन विभागाच्या नागपूर मुख्यालयात दोन्ही प्रकरणांनी खळबळ माजविली असून कोणताही बडा अधिकारी याबाबत विस्ताराने बोलण्यास तयार नाही. मेळघाटातील शिकार प्रकरणात पाच जणांना अटक झाल्यानंतर वाघांच्या शिकारीची पाच प्रकरणे चव्हाटय़ावर आली. अद्यापही दोन वाघ बेपत्ता आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळाचा (डब्लूसीसीबी) आपसात समन्वय नाही. वाघांच्या शिकारीच्या पाश्र्वभूमीवर सर्पमित्रांनीच सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्यांशीच संधान बांधल्याचे अकोला आणि चंद्रपुरातील अटकसत्राने स्पष्ट झाले.  
चंद्रपुरात कथित सर्पमित्र म्हणवून घेणारा सुशील सिरसाट हा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकच टोळीचा प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू झाली आहे. वराऱ्याच्या आनंदवनातील या शिक्षकाने स्वत:ची सर्पमित्र म्हणून प्रतिमा निर्माण केली होती. शुक्रवारी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्याने नागपुरातील विश्वजित वानखेडे ऊर्फ काका याला १५ मिलीग्रॅम सापाचे विष विकल्याची कबुली दिली. सापाच्या १ मिलीग्रॅम विषासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १ लाख ते ४ लाख रुपये मोजावे लागतात. तत्पूर्वी बुधवारी अकोल्यात पकडलेल्या टोळीकडून ४० लाख रुपयांचे विष जप्त करण्यात आले आहे. या टोळीतील प्रकाश पारेख, अमीत भालेकर आणि रमेश कटारिया यांनीही सापाचे विष विकत असल्याची कबुली दिली आहे. अकोला येथील सर्प विष प्रकरणाचे धागे वरोरा वनपरिक्षेत्राशी जुळले असल्याची माहिती मिळाल्यानंतर चंद्रपुरातही कारवाई करण्यात आली तेव्हा सिरसाटचे बिंग फुटले.
चंद्रपूरचे विभागीय वन अधिकारी एन.डी. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील सुशील सिरसाट आणि त्याचे कथित सर्पमित्र साथीदार कोब्रा आणि अन्य विषारी साप पकडून त्यांचे विष बॉटलमध्ये भरण्याचे काम अनेक दिवसांपासून करीत होते. वरोरा आणि आसपासच्या खेडय़ांमधून साप पकडल्यानंतर रबराचे झाकण असलेल्या बॉटलवर सापाला डंख मारायला लावायचे आणि त्याचे विष गोळा करायचे असा या टोळीचा धंदा होता. मुंबईतील एका व्यावसायिकाला तो विष विकत होता. जिल्हा आणि तालुका पातळीवरील अनेक सर्पमित्र यात सहभागी असल्याचे त्याने सांगितले असल्याने अनेक कथित सर्पमित्र भूमिगत झाले आहेत. सुशील सिरसाट याच्या वरोऱ्यातील निवासस्थानी सापाचे विष काढण्याचे साहित्य, व्हॉलीबॉलचे ब्लॅडर, दोरी, सिरिंज आदी साहित्य सापडले.