साप आणि मुंगसाच्या लढाईसह हातचलाखीचे प्रयोग दाखविणारा कसबी कलाकार असलेले गारुडी आता जवळपास नामशेष झाले आहेत. सरकारने आणलेल्या २००२ पासूनच्या कायद्यानंतर त्यांनी सापांचे खेळ बंद केले असले तरी नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र त्यांची प्रतीक्षा केली जाते. सरकारच्या बडग्यामुळे या जमातीच्या पोटावर पाय पडला असून, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.
मुळातच भटकी जमात असलेल्या या गारुडींनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देण्यास नकार देत शासनाविषयी रोष व्यक्त केला. गारुडीपणा संपला तसा या जमातीच्या काही लोकांनी मजुरी, तर काहींनी इतर कामे सुरू केली, पण आजही या जमातीच्या नशिबी वनवासच आहे. आपली ओळख देण्यास अनुत्सुक असलेल्या या जमातींचे साप म्हणजे दैवत होते. जमातीतील प्रत्येक घरात साप असायचे, तर कधी गावात साप निघाला की, त्यांना साप पकडण्यासाठी सन्मान मिळायचा. आता त्यांची जागा सर्पमित्रांनी घेतली आहे. काही सर्पमित्रांच्या व्यवहारावरून ते सर्पमित्र की सर्पशत्रू, असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. पावसाळ्यात निघालेले साप पकडून काही दिवस ठेवल्यानंतर त्याचे खेळ सुरू करायचे, हा पिढीजात धंदा करणारे गारुडी आपल्या उस्तादाचा उल्लेख अतिशय आदरपूर्वक करतात. सरकारने आपल्या कामावरील बंदी उठवली, तर आपण त्याच व्यवसायाला प्राधान्य देणार असल्याचे ते आजही मोठय़ा अभिमानाने सांगतात. या कष्टकरी समाजातील लहान मुलांच्या नशिबीही उपेक्षाच आली. कधी स्थिर नसलेल्या वास्तव्यामुळे समाजात शिक्षणाने प्रवेश केलाच नाही. आताही त्यांच्या पाटय़ा कोऱ्याच आहेत. घरातीत वडीलधारी कामाचा शोधात फिरतात तेव्हा यांची मुलेही वाऱ्यावर असतात.
वन व पशुहिंसा कायद्याने त्यांच्याकडील साप सरकारने काढून घेतले. मात्र, हाती कोणत्याही नव्या प्रकाशरेषा न देता केवळ काळोखात आणि अपरिचित अवस्थेत आपले जीवन शोधण्याच्या प्रयत्नात ही जमात लागली आहे. त्यांच्यापर्यंत शासनाची कुठलीही योजना पोहोचलेली नाही. अतिशय तुरळक असलेली ही जमात अशिक्षित असल्याने त्यांना आपल्या समस्या मांडता येत नाही. या जमातीचा खरा उपयोग तर सापाचे ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी करायला हवा होता, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. आजही ९० टक्के साप अज्ञानापोटी मारले जातात. मात्र त्यांच्यावर काय कारवाई केली, असा प्रश्न अंतर्मुख करून जातो. आजही या जमातीतील वृध्द पुन्हा आवडत्या व्यवसायाकडे वळण्याच्या आशेवर आहेत. सापाला क्रूरतेने हाताळतात म्हणून त्यांच्या उपजीविकेपासून त्यांना वंचित ठेवणाऱ्या तथाकथित निसर्गप्रेमींनी त्यांच्या पुनर्वसनासाठी नेमके कोणते प्रयत्न केले, असा प्रश्नही उपस्थित होतो. नागपंचमीला सापांचे दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्य मात्र आजही गारुडी साप घेऊन येईल, या आशेवर आहेत.