सांगली येथील गुंडविरोधी पथकाने एका सदनिकेवर छापा टाकून सुमारे १ कोटी १२ लाख रुपये कि मतीचा सापांच्या विषाचा साठा जप्त केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी गुन्हा दाखल झाला असून अब्बास हसन मुल्ला (वय ४२, रा.कोवाड, ता.चंदगड, जि.कोल्हापूर) व चंद्रकांतनाना टीकार (वय ५६, रा.गव्हर्नमेंट कॉलनी, सांगली) या दोघांना अटक केली आहे. तर मारूती घाटगे(रा.माद्याळ, ता.कागल ) हा आरोपी फरार झाला आहे.    सांगलीतील विश्रामबाग परिसरातील विजय अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत सापांच्या विषारी साठय़ासह काही लोक राहिले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर, संदीप चव्हाण, महेश आवळे, वैभव पाटील, सागर लव्हटे, पप्पू सुर्वे, गुंडू खराडे आदी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. पोलीस पथकाने आत प्रवेश करून शोधाशोध केली तेव्हा १ लिटर १० मिलीग्रॅम इतका सापांच्या विषाचा साठा काचेच्या बाटलीत थर्माकॉलच्या बॉक्समध्ये लपवून ठेवल्याचे आढळले. याची किंमत सुमारे १ कोटी १२ लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी विषाच्या साठय़ासह मुल्ला व टिकर यांना अटक केली. मारूती घाटगे या फरारी आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.