मांडूळ जातीच्या दुर्मीळ सापांची तस्करी करण्यासाठी सोलापुरात आलेल्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून तीन फूट लांबीचा मांडूळ जातीचा सर्प जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.

बेगम नजीर सय्यद असे या ४५ वर्षीय महिलेचे नाव आहे. ही महिला अंबिका नगरात मांडूळ जातीच्या सापांची तस्करी करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून अंबिका नगरात ब्लॉक क्रमांक पाच समोर सापळा लावला. सायंकाळी संबंधित महिला तेथे आली असता तिला ताब्यात घेण्यात आले.

तिच्याकडे पांढऱ्या रंगाच्या बंद परडीत सर्प आढळून आला. खात्री केली असता तो सर्प मांडूळ जातीचा असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तो साप जप्त करून त्या महिलेला अटक करण्यात आली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.

दरम्यान अटक झालेल्या महिलेने आरोप फेटाळून लावले आहेत. तिच्या मते ती गारुडी आहे. तिच्याकडे असलेला मांडूळ साप लोकांना दाखवून ती पैसे मागायची. परंतु हा दुर्मीळ साप तिला मिळाला कुठुन याबाबत आता तिची चौकशी सुरु आहे.