News Flash

उपचाराबरोबरच बाधितांच्या बालकांवर छत्रछाया

दुर्गम गावात राहणारे परमेश आणि जया हे शेतमजूर संसर्ग विकोपाला जाऊ नही त्यांची झोपडी सोडायला तयार नव्हते.

|| मोहनीराज लहाडे

वंचितांच्या समाज स्वास्थ्यासाठी ‘स्नेहालय’चा उपक्रम

नगर : कष्टकरी, कामगार, शेतमजूर अशा वंचित घटकांतील नागरिकांना करोना संसर्ग होतो, त्यावेळी तो केवळ एक आजार न राहता त्यासोबत अन्य समस्याही निर्माण करतो. त्यांची जगण्याची दैनंदिन लढाई, उपचारांबाबत चालढकल, पराकोटीची आरोग्य निरक्षरता आणि या साऱ्याबरोबरच मुलांचे प्रश्न त्यांना सतावू लागतात. या उपेक्षितांच्या चिंतेचाच विचार करून नगरच्या ‘स्नेहालय’ने करोना उपचाराबरोबरच निराधार मुलांसाठी आधाराचे छत्र उभारले आहे.

दुर्गम गावात राहणारे परमेश आणि जया हे शेतमजूर संसर्ग विकोपाला जाऊ नही त्यांची झोपडी सोडायला तयार नव्हते. आपण दोघेही रुग्णालयात दाखल झालो तर आपल्या सहा वर्षांच्या मनीषाला कोणाकडे सोडायचे हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता…गृहसेविका शबाना आणि रिझवान,  संसर्ग गंभीर परिस्थितीत पोहोचला असतानाही  तावीज बांधून ईश्वराधना करीत होते. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे तर नव्हतेच, परंतु ११ वर्षांची मुलगी रुबिना आणि आठ वर्षांचा मुलगा सोहेल या दोघांना कु ठे ठेवायचे हाच यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता…

या आणि अशाच अनेक प्रश्नांच्या गुंत्यातून ‘स्नेहालय’ने या उपेक्षित वर्गासाठी करोना उपचारांबरोबरच त्यांच्या काही काळासाठी निराधार होणाऱ्या मुलांसाठी छत्रछाया उभारण्याचे काम उभे केले आहे. ‘अनामप्रेम कोविड केअर सेंटर’ (निंबळक, ता. नगर) नावाने सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये आज समाजातील उपेक्षित वर्गातील रुग्ण आणि त्यांची मुलांची देखभाल केली जात आहे.  करोना साथीने सामाजिक, आर्थिक आणि कुटुंब व्यवस्थेशी निगडित अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आपल्या बालकांच्या काळजीपोटी उपचाराकडे पाठ फिरवणारे, विशेषत: कष्टकरी, कामगार, शेतमजूर, झोपडपट्टीतील रहिवासी असलेले अनेक रुग्ण आहेत. त्यांचा शोध घेऊन, त्यांना आधार देत, प्रसंगी त्यांचे समुपदेशन करत त्यांना उपचारासाठी दाखल केले जाते.

आजपर्यंत १९ मुला-मुलींना त्यांच्या आई-वडिलांसह येथे दाखल केले गेले आहे. त्यांच्या रुग्ण आई-वडिलांवर उपचार, तर या मुलांना आधार दिला जात आहे. १३० खाटांची व्यवस्था असणाऱ्या या केंद्रामध्ये अन्य करोना बाधितांवरही उपचार केले जातात. अशा प्रकारे या केंद्रातून ४१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या केंद्राच्या माहितीसाठी ‘राहत हेल्पलाईन’ (९०११०२०१७४ किंवा ९०१२०२६४८५) सुरू करण्यात आली आहे.

‘स्नेहपरीस’ उपक्रम

करोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपून अनाथ झालेल्या बालकांना नातलग तात्पुरता आसरा देतात. मात्र तरीही त्यांच्या पुनर्वसनात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. अशा नऊ बालकांच्या नातलगांचे ‘स्नेहालय’चे स्वयंसेवक समुपदेशन करीत आहेत. अशा बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘स्नेहपरीस’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे ‘अनामप्रेम’चे समन्वयक अजित कु लकर्णी यांनी सांगितले.

करोनामुक्त गाव अभियान

‘स्नेहालय’ने करोना उपचार, आधाराबरोबरच जनजागृतीचे कामही सुरू केले आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत सध्या परिसरातील २२ गावे आणि नगर शहरांच्या उत्तर भागात ‘करोनामुक्त गाव अभियान’ सुरू करण्यात आले आहे. प्रचार फलक, घरोघर माहिती पत्रक वाटप, दवंडी, ‘रेडिओ नगर’ या कम्युनिटी रेडिओ केंद्राच्या माध्यमातून ही जनजागृती सुरू आहे.

खेळ, प्रबोधन, मनोरंजन : ‘स्नेहालय’च्या करोना उपचार केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांवर नि:शुल्क उपचार केले जातातच, पण त्यांच्या मुलांसाठीही विविध उपक्रम राबवले जातात. हस्तकला, खेळ, पुस्तक वाचन या माध्यमातून मुलांचे मनोरंजन आणि प्रबोधनही केले जाते. रोज सायंकाळी येथे हौशी गायक, कलाकार, वादक आपल्या कलांचे सादरीकरण करतात. केंद्रातील रुग्ण सुरक्षित अंतरावरून त्याचा आनंद घेतात. उपचार घेणाऱ्या पालकांना आपल्या डोळ्यासमोरच आपली मुले खेळता- बागडताना दिसतात.

बाधितांसाठी आर्थिक मदत : नगर जिल्ह्यात करोनाने दगावलेल्या अनेकांची कुटुंबे आज उघड्यावर आली आहेत. त्यांच्या मदतीसाठी ‘स्नेहालय’तर्फे एक मदतनिधी उभा करण्याचे काम सुरू आहे. यातून अशा कुटुंबांना किमान ३० हजार रुपयांची मदत देण्याचे उद्दिष्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 1:49 am

Web Title: snehalaya initiative for the social health of the underprivileged akp 94
Next Stories
1 चला जाऊ, प्राणवायू प्रकल्प पाहू!
2 ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ‘खेडय़ाकडे चला’चा उपक्रम
3 राजीव गांधींच्या आदरांजली सभेत राजीव सातव यांनाही श्रद्धांजली!
Just Now!
X