महाराष्ट्रात सगळी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हळूहळू सूर्यनारायण तापतोय अशात महाबळेश्वर येथील वेण्णा लेक आणि लिंगमाळा परिसरात पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरी शुभ्र चादर पसरल्याचे दिसून आले. निसर्गाच्या या अविष्काराचा स्थानिकांसह पर्यटकांनीही आनंद घेतला.

गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर भागात सकाळचे आणि रात्रीचे वातावरण आल्हाददायक होते. आज सकाळी तर वेण्णा लेक आणि लिंगमाळा परिसरात प्रचंड थंडी होती. सकाळी या परिसरात असलेले स्ट्रॉबेरीचे मळे, लिंगमाळा भागातील स्मृतीवनाच्या पठारावरचे गवत, पाने, फुले आणि वेली यांच्यावरचे दवबिंदू गोठले आणि त्याचे रूपांतर हिमकणांमध्ये झाले. हिमकणांची ही चादर निसर्गाचे अनोखे सौंदर्य दाखवणारी ठरली. हिवाळ्यात हे दृश्य बऱ्याचदा दिसते. मात्र उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच असे दृश्य दिसणे दुर्मीळ आहे.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्वरचे किमान तापमान १० डिग्री सेल्सियस होते तर वेण्णा लेक परिसरात पारा ४ अंशापर्यंत खाली उतरला होता. १३ मार्च २०१७ आणि ४ मार्च २०१५ या तारखांनाही असेच हिमकण बघायला मिळाले होते. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा आला.